न्यूयॉर्क : येत्या पाच जुलैला मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा देणार आहे, असे अॅमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी म्हटले आहे. अॅमेझॉनला इंटरनेट बुक स्टोअर ते ऑनलाइन शॉपिंग कंपनी बनवणाऱ्या जेफ बेझोस यांनी बुधवारी सांगितले की, अँडी जेसी हे आता 5 जुलैला अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. अँडी जेसी सध्या अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. (Jeff Bezos Said That He Will Step Down As The Ceo Of Amazon On July 5)
"आम्ही ही तारीख निवडली आहे, कारण या तारखेला माझ्यासाठी भावनिक महत्त्व आहे", असे जेफ बेझोस यांनी बुधवारी अॅमेझॉनच्या भागधारकांच्या बैठकीत सांगितले. 27 वर्षांपूर्वी 1994 साली याच दिवशी अॅमेझॉनची स्थापना करण्यात आली होती, असे जेफ बेझोस म्हणाले. दरम्यान, अॅमेझॉन कंपनीने यंदा फेब्रुवारीमध्ये जेफ बेझोस हे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यावेळी जेफ बेझोस हे राजीनामा कधी देणार? याबाबत कोणतीही तारीख कंपनीकडून सांगितली नव्हती.
राजीनाम्यानंतर काय करणार जेफ बेझोस?मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार सोडल्यानंतर जेफ बेझोस कार्यकारी अध्यक्ष पदाच्या नवीन भूमिकेत असतील, असे अॅमेझॉन कंपनीने म्हटले होते. तर जेफ बेझोस यांनी सांगितलेआहे की, त्यांच्याजवळ इतर प्रकल्पांसाठी खूप वेळ असेल, ज्यामध्ये त्यांची अंतराळ संशोधन कंपनी ब्लू ओरिजिन, त्याद्वारे चालविण्यात येणारे परोपकारी कार्य आणि वॉशिंग्टन पोस्टची देखरेख यांचा समावेश आहे. सध्या अमेझॉनमध्ये 13 लाख लोक काम करत आहेत आणि ते जगभरातील कोट्यावधी लोकांना आणि व्यवसायांना सेवा पुरवतात.
जेफ बेझोस सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, जेफ बेझोस यांच्याकडे 190 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्यांच्यापाठोपाठ टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांची संपत्ती आहेत. सोमवारी फॅशन लक्झरी गुड्स कंपनी LVMH चे मालक बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जेफ बेझोस यांना पाठीमागे टाकत सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. परंतु काही तासांनंतर अॅमेझॉन शेअर्सच्या वाढीमुळे जेफ बेझोस पुन्हा पुढे गेले आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले.