नवी दिल्ली - जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस(Jeff Bezos) यांच्या महाकाय ई-कॉमर्स कंपनी Amazon नं त्यांच्या कर्मचार्यांना नोकरी सोडण्यासाठी ४ लाख रुपयांपर्यंत ऑफर दिली आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हे अगदी खरे आहे. ही ऑफर एका कंपनीत एका विशेष कार्यक्रमांतर्गत दिली जात आहे, ज्याचे नाव आहे पे टू क्विट(Pay to Quit), यासोबतच संबंधित एक टॅगलाइन देखील आहे. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
दरवर्षी वाढणार ऑफरची रक्कम
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे त्यांच्या वेगवेगळ्या नेतृत्व धोरणांसाठी जगभरात ओळखले जातात. यापैकी एक म्हणजे त्यांच्या कंपनीत काम करणार्या कर्मचार्यांना कंपनीपासून वेगळे झाल्यानंतरही त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी मदत करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. या उद्देशासाठी, कंपनीने पे टू क्विट प्रोग्राम सुरू केला आहे, ज्यामध्ये कंपनीची नोकरी सोडणाऱ्यांना २००० डॉलर (१,६६,५४८ रुपये) ची ऑफर दिली जात आहे. विशेष बाब म्हणजे जर कर्मचाऱ्याने नोकरी सोडण्याचा प्लॅन एका वर्षासाठी वाढवला तर ही ऑफर २ हजार डॉलर ऐवजी ३००० डॉलर होईल. म्हणजेच दरवर्षी या ऑफरची रक्कम १ हजार डॉलरनं वाढेल. या ऑफर अंतर्गत कमाल मर्यादा ५ हजार डॉलर म्हणजेच ४ लाख १६ हजार ३७३ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
या कंपनीपासून प्रेरणा घेऊन केली सुरुवात
२०१४ मध्ये शेअरहोल्डर्सना लिहिलेल्या पत्रात जेफ बेझोस यांनी म्हटलंय की, Amazon वर आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यापेक्षा जास्त आनंद कुठेही मिळत नाही, विशेषत: कंपनी समर्पित आणि उत्साही कर्मचारी वर्ग कायम ठेऊन आणि त्यांच्या करिअरची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करते. बेझोसचा हा पे टू क्विट कार्यक्रम याच कल्पनेशी संबंधित आहे. अॅमेझॉनच्या आधी झाप्पोस(Zappos) कंपनीतही अशा प्रकारचा पुढाकार घेण्यात आला असून, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. यापासून प्रेरित होऊन अॅमेझॉननेही हे पाऊल उचलले आहे.
कंपनी आणि कर्मचारी दोघांच्या फायद्याचे
अॅमेझॉनने त्याच्या फुलफिलमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांना Pay to Quit कार्यक्रमातंर्गत ही ऑफर दिली आहे. याद्वारे ते केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर कंपनीचाही फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागेही एक मोठे कारण म्हणजे नोकरी सोडण्याची तयारी करत असलेल्या किंवा प्लॅन बनवत असलेल्या कर्मचाऱ्याला नवीन नोकरी मिळविण्यासाठी आणि नोकरी सोडल्यानंतर त्याच्या मोकळ्या वेळेत आर्थिक मदत मिळेल, तर या ऑफर अंतर्गत दरवर्षी मिळणार्या रकमेत वाढ केल्यास कर्मचारी जॉब सोडण्याचा प्लॅन पुढे ढकलून कंपनीसोबत काम करेल. Amazon ने या ऑफरसोबत एक टॅगलाईन लिहिली आहे त्यात कंपनीने म्हटलंय की, Please Don’t Take This Offer, जे कर्मचार्यांना कंपनीसोबत राहण्यासाठी अॅमेझॉनची प्राथमिकता देते.