अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझोस यांनी जगभरातील लोकांना मोठा सल्ला दिला आहे. ते स्वत: जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन मार्केटचे मालक आहेत, तरीही त्यांनी लोकांनी आता महागड्या वस्तू खरेदी करणे टाळावे, कारण मंदीनं दार ठोठावलं आहे, असा सल्ला देऊ केला आहे. अमेरिकन टीव्ही चॅनल CNN ला दिलेल्या मुलाखतीत जेफ बेजोस यांनी हे विधान केलं आहे. लोकांनी सध्या टीव्ही आणि कारसारख्या उच्च श्रेणीच्या वस्तू खरेदी करणं बंद केलं पाहिजे कारण मंदीचा बराच काळ अजून संपायचा आहे, असं जेफ बेजोस म्हणाले.
जेफ बेझोस यांनी आणखी एक चांगला सल्ला दिला आहे. सध्याच्या काळानुसार लहान कंपन्यांनी मोठा खर्च करणं किंवा कोणतंही मोठं अधिग्रहण करणं टाळलं पाहिजं, असं अॅमेझॉन आणि ब्लू ओरिजिनचे संस्थापक बेजोस म्हणाले. त्यांच्या मते, जगातील सर्वात मोठ्या कंपन्या सध्या मंदीच्या दबावाचा सामना करत आहेत. विशेषतः टेक कंपन्यांचा यात समावेश आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी कंपनीच्या निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. दुसरीकडे, मेटानेही ११ हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
जेफ बेजोस यांचा सल्ला
Amazon ची सध्याची स्थिती पाहिली तर एका वर्षात कंपनीची मालमत्ता ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. या दबावाखाली कंपनीने १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीनं गेल्या महिन्यापासूनच नोकरभरती बंद केली होती. जोपर्यंत आर्थिक परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत Amazon नवीन भरती करणार नाही. सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडे काही अतिरिक्त रोख असणे आवश्यक आहे. तुम्ही आता रिस्क घेणे देखील टाळले पाहिजे, असं ते बेजोस म्हणाले.
आर्थिक मंदीचा फटका
जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली आहे. अमेरिका, ब्रिटनमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे, ती कमी करण्यासाठी धोरणात्मक दर वाढवले जात आहेत. त्याचा मोठा परिणाम आर्थिक विकासावर दिसून येत आहे. एका अहवालानुसार, सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ब्रिटनची अर्थव्यवस्था घसरली आहे. येत्या काही महिन्यांत अर्थव्यवस्थेत आणखी घसरण होऊ शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत ब्रिटनचा जीडीपी ०.२ टक्क्यांनी घसरला. मात्र, ही घसरण अपेक्षेपेक्षा कमी आहे. परंतु हे दीर्घ मंदीचे संकेत आहेत. यूकेची अर्थव्यवस्था सप्टेंबरमध्ये ०.६ टक्के आणि ऑगस्टमध्ये ०.१ टक्क्यांनी खाली आली आहे.