नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने जेट एअरवेज आणि एअर इंडिया या दोन बड्या विमान कंपन्या ताब्यात घेण्यात रस दाखविला असल्याचे वृत्त आहे. आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज बुधवारी बंद पडली असून, सरकारी मालकीची एअर इंडियाही अखेरच्या घटका मोजत आहे. दोन्ही कंपन्यांचा मिळून भारतीय हवाई उड्डाण क्षेत्रात २५ टक्के बाजार हिस्सा आहे.
सुमारे २५ वर्षे उड्डाण करणाऱ्या जेट एअरवेजला गेल्या वित्त वर्षात मोठा तोटा सहन करावा लागला होता. स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) तातडीची मदत म्हणून ९८३ कोटी रुपये देण्यास नकार दिल्यानंतर कंपनी बंद पडली. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कर्जदात्या बँक समूहाने जेट एअरवेज विकण्याची प्रक्रिया याआधीच सुरू केली आहे. बँक समूहाने इच्छुक कंपन्यांकडून इच्छापत्रेही (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) मागितली आहेत. मात्र इच्छापत्रे सादर करणाºया कंपन्यांत रिलायन्स नाही. कंपनी यूएईस्थित एतिहाद एअरवेजच्या निविदेत नंतर सहभागी होणार आहे.
एतिहादला हिस्सा वाढवणे शक्य
जेट एअरवेजमध्ये २४ टक्के हिस्सेदारी असलेल्या एतिहादने इच्छापत्र भरले आहे. नियमानुसार, एतिहाद आॅटोमॅटिक रूटद्वारे जेट एअरवेजमधील आपली हिस्सेदारी ४९ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. त्यापुढील हिस्सेदारी खरेदीसाठी सरकारची परवानगी लागेल.
एअर इंडियावर ४८ हजार कोटींचे कर्ज
सरकारने एअर इंडियाच्या विक्रीचा प्रयत्न गेल्या वर्षी केला होता. तथापि, खरेदीदारच न मिळाल्याने हा प्रयत्न फसला. त्यानंतर आता मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजने एअर इंडियात रस दाखविला आहे. कंपनीच्या एकात्मिक योजनेंतर्गत एअर इंडियाची खरेदी करण्याचा विचार केला जात आहे.
एका अधिकाºयाने सांगितले की, ही बोर्डरूम रणनीती असून, नंतरच्या टप्प्यात यावर विचार केला जाईल. चर्चा हळूहळू गती घेत आहे. इच्छुक पक्षांना माहिती आहे की, त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. एअर इंडियावर तब्बल ४८,७८१ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
कर लो एअरलाईन्स मुठ्ठी में? जेट एअरवेज, एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस
अधिकृतपणे इच्छा व्यक्त केली नाही; मात्र प्रयत्न सुरू झाले असल्याची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:22 AM2019-04-21T06:22:07+5:302019-04-21T06:37:41+5:30