>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. ९ - जेट एअरवेज या कंपनीने बोइंग या अमेरिकी विमान उत्पादन कंपनीकडून तब्बल ७५ विमाने खरेदी करणार असल्याचा करार केला आहे. द्विवार्षिक दुबर् एअरशोमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
बोइंगच्या ७३७ MAX या उत्पादनांचा ताबा मिळणारी जेट एअरवेज ही पहिली विमान कंपनी ठरणार आहे. जुन्या विमानांच्या जागी अत्याधुनिक विमाने घ्यायची हा जेटच्या धोरणाचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या करारानुसार जेट एअरवेजने २५ विमानांची मागणी नोंदवली असून आणखी ५० विमानांच्या मागणीचा पर्याय खुला ठेवला आहे.
जेट एअरवेजची नवी विमाने इंधन बचत करणारी असल्याचे सांगताना तब्बल २० टक्के इंधनाची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बोइंगच्या अंदाजानुसार येत्या २० वर्षांमध्ये भारत १,७४० नवी विमाने विकत घेण्याची शक्यता आहे. या कालावधीत विमानानं प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढेल असा अंदाज आहे.