नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात सापडलेली विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नरेश गोयल यांच्यासोबत त्यांची पत्नी अनिता गोयल यांनीही जेट एअरवेजमधील आपले पद सोडले आहे.
नरेश गोयल हे जेट एअरवेजच्या मुख्य प्रवर्तकांपैकीएक होते. दरम्यान, कंपनीची आर्थिक बाजू कोलमडू लागल्यानंतर स्वत:हून नरेश गोयल यांनी स्वत:हून पुढाकार घेत राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यादरम्यान त्यांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना एक भावूक पत्र लिहून आपण कुठलेही बलिदान देण्यास तयार आहोत, असे म्हटले होते.
Sources: Jet Airways Chairman Naresh Goyal and his wife Anita Goyal step down from Jet Airways Board due to financial crisis; bank-led board to run the airlines. pic.twitter.com/f3NVDOhFNs
— ANI (@ANI) March 25, 2019
नरेश गोयल हे पदावरून दूर झाल्यानंतर आता जेटच्या कर्जपुरवठादारांच्या संघटनेचे सदस्य त्यांच्याकडील 51 टक्के भागीदारीचे एअरलाइन्समध्ये विलिनीकरण करू शकतात. त्यानंतर येत्या काही आठवड्यांमधये जेट एअरवेजसाठी नव्या खरेदीदाराचा शोध सुरू होईल. गोयल हे पदावरून दू झाल्याने आता जेट एअरवेजला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी सीईओ विनय दुबे यांच्यावर असेल.
दरम्यान, जेट एअरवेजला आपातकालीन निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे. पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया 25 वर्षे जुन्या असलेल्या या विमान वाहतूक कंपनीला प्राधान्याने निधी देतील. कर्जपुरवठादारांकडून प्राधान्याने कर्ज मिळाल्याने जेट एअरवेजला मदत होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत या कंपनीला वाचवण्यासाठी काही नवीन योजना समोर येत नाही तोपर्यंत ही कंपनी चालू राहू शकेल.
दरम्यान, जेट एअरवेजच्या डोक्यावर सध्या एकूण 26 बँकांचे कर्ज आहे. त्यातील काही बँका खासगी आहेत तर काही बँका विदेशी आहेत. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीस बँक, इलाहाबाद बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचेही जेट एअरवेजवर कर्ज आहे. आता या यादीत एसबीआय आणि पीएनबीचे नावही जोडले गेले आहे.