मुंबई : देशातील विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे मंगळवारी अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचा मोर्चा अन्य विमान कंपन्यांकडे वळला आहे. यामुळे देशातील सर्व प्रमुख मार्गांवर भाडे तब्बल सहा पटींनी महागले आहे. याचा परिणाम उन्हाळी सुट्टीमध्ये फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवर होणार असून हवाई भाडे महागणार आहे.
सध्या परिक्षांचा हंगाम असून पुढील काळात सुट्ट्या सुरु होतील. यामुळे बरेचजण देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देतात. मंगळवारी जेट एअरवेजच्या एकूण 119 विमानांपैकी 36 विमानांनीच उड्डाण केले. जेटने अचानक विमाने रद्द केल्याने त्या विमानांतील प्रवासी दुसऱ्या विमान कंपन्यांकडे वळले. यामुळे एका रात्रीत विमान भाडे वाढले. मुंबई- दिल्ली, मुंबई- बंगळूरू, मुंबई-कोलकाता आणि चेन्नई सारख्या व्यस्त मार्गावर विमान भाडे कमालीचे महागले आहे. जेथे या मार्गाचे भाडे 5 हजार होते ते एका रात्रीत 30 हजारावर गेले आहे.
मंगळवारी झालेल्या भाडेवाढीमुळे मुंबई-दिल्ली प्रवासासाठी 15,518 रुपये खर्च करावे लागत आहेत. गेल्या वर्षी हेच भाडे 6577 रुपये भाडे होते. याचप्रमाने मुंबई-चेन्नई यात्रेसाठी 5369 रुपयांऐवजी 26 हजार रुपये तर मुंबई- बंगळूरूसाठी 2600 ऐवजी 16 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
परतीच्या प्रवासासाठीही मोजा हजारो रुपये
केवळ जाण्याचेच भाडे नाही तर मागे येण्याच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. मुंबई-दिल्ली-मुंबईचे भाडे 14 हजार ते 36 हजार रुपये झाले आहे. तर दिल्ली-लखनऊ-दिल्ली प्रवासाचे भाडे 8 हजार ते 23799 रुपये झाले आहे. मुंबई-लखनऊ-मुंबई प्रवासचे भाडे 28660 रुपयांपासून 47114 रुपये एवढे झाले आहे. मुंबई-जम्मू-मुंबई चे भाडेही 16,323 रुपयांपासून 26,817 रुपये झाले आहे. मुंबई-पटना-मुंबई प्रवासाचे भाडे 34,494 रुपयांपासून 62964 रुपयांवर पोहोचले आहे. दिल्ली-पटना-दिल्लीसाठी 22,388 रुपये ते 42,968 रुपये एवढे झाले आहे. दिल्ली-डेहराडून-दिल्ली प्रवासासाठी 7,554 रुपये ते 12028 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्ली-चंडीगढ़-दिल्लीचे भाडे 20 हजार ते 28 हजार रुपये एवढे झाले आहे.
शेअर घसरला
कर्जाच्या विळख्यात अडकलेली विमान कंपनी जेट एअरवेजचे शेअर 11 टक्क्यांनी घसरले आहेत. एप्रिलपर्यंत जर जेटची हालत आणखी खराब झाल्यास विमान भाडे लाखाच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.