जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक करण्यात आली आहे. सक्तवसूली संचलनालयानं त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी ईडीनं त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ५३८ कोटी रुपयांचं हे प्रकरण कॅनरा बँकेशी निगडीत आहे, यामध्ये कारवाई करत ईडीनं नरेश गोयल यांना अटक केली. दरम्यान शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
काय आहे प्रकरण
नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध ईडीने फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीतील आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. ५३८ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी छापा टाकल्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. सीबीआयनं आपल्या तपासात गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि जेट एअरवेजचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी यांना आरोपी केलं. कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून तपास यंत्रणेनं नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीत, कॅनरा बँकेनं आरोप केला होता की त्यांनी जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडला (जेआयएल) ८४८.८६ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होते, त्यापैकी ५३८.६२ कोटी रुपये थकित आहेत.
वादात सापडले
यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीविरोधातील मनी लाँड्रिंगचा खटला फेटाळून मोठा दिलासा दिला होता. मात्र, नवे प्रकरण समोर आल्यास ईडी त्याची चौकशी करू शकते, असं न्यायालयानं म्हटलं होतं. आता या प्रकरणी चौकशीनंतर ईडीनं गोयल यांना अटक केली आहे.
तपास संस्थेनुसार, १ एप्रिल २०११ ते ३० जून २०१९ दरम्यान, प्रोफेशनल आणि कन्सल्टन्सीच्या रुपात ११५२.६२ कोटी रुपये खर्च केले गेले. जेट एअरलाइन्सशी संबंधित कंपन्यांचे १९७.५७ कोटी रुपयांच्या व्यवहार तपासात आहेत. तपासणीत असं आढळून आलं की, कंपनीनं ११५२.६२ कोटी रुपयांपैकी ४२०.४३ कोटी रुपये प्रोफेशनल आणि कन्सल्टन्सी खर्चाच्या रुपात म्हणून अशा कंपन्यांना दिले आहेत ज्यांचा अशा सेवेशी काहीही संबंध नाही.
अनेक प्रकरणांचा तपास
एकेकाळी देशातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी असलेली जेट एअरलाइन्स एप्रिल २०१९ मध्ये मोठ्या कर्जामुळे आणि रोखीच्या तुटवड्यामुळे बंद पडली. संयुक्त अरब अमिरातीचे व्यापारी मुरारी लाल जालान आणि लंडनस्थित कंपनी कार्लरॉक कॅपिटल यांच्या एका कन्सोर्टियमनं जून २०२१ मध्ये जेट एअरलाईन्स दिवाळखोरी प्रक्रियेत विकत घेतली. तेव्हापासून विमान कंपनीच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू आहे. जेट एअरवेज वादात सापडल्यापासून अनेक एजन्सी त्यांच्या कारभाराची चौकशी करत आहेत. यामध्ये ईडी, सीबीआय, आयकर आणि एसएफआयओ यांचा समावेश आहे.