Join us

Jet Airwaysचे फाऊंडर नरेश गोयल यांना गंभीर आजार, वकिलांनी मागितला ६ महिन्यांचा जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 3:49 PM

जेट एअरवेजचे  संस्थापक नरेश गोयल यांना एका गंभीर आजारानं ग्रासलं असल्याची माहिती न्यायालयासमोर देण्यात आली.

जेट एअरवेजचे  संस्थापक नरेश गोयल यांना एका गंभीर आजारानं ग्रासलं असल्याचं मुंबईच्या जेजे रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डानं म्हटलंय. परंतु, त्यांना पुढील चाचणी आवश्यक आहे. बोर्डानं २३ फेब्रुवारीला याबाबत विशेष न्यायालयाला माहिती दिली. नरेश गोयल सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आपल्या शरीरात मॅलिग्नेंट ट्युमर असल्याची माहिती १५ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयात सांगितलं होतं. गोयल यांनी खासगी डॉक्टरांच्या अहवालाच्या आधारे खासगी रुग्णालयात कर्करोगावरील उपचारासाठी सहा महिन्यांसाठी न्यायालयाकडे अंतरिम जामीन मागितला होता. मॅलिग्नेंट ट्युमर कर्करोगाच्या श्रेणीत येतो. 

यानंतर न्यायालयानं ७४ वर्षीय गोयल यांच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले. कॅनरा बँकेतील ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गोयल तुरुंगात आहेत. सक्तवसूली संचालनालयानं (Enforcement Directorate) गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी कथित बँक फसवणूक प्रकरणी गोयल यांना अटक केली होती. 

प्रकृतीच्या कारणावरून गोयल यांच्या मागण्यात आलेल्या जामीनाला ईडीनं विरोध केला आहे. तसंच त्यांच्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं. २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, ईडीनं सांगितलं की जेजे रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाने कोणतंही स्वतंत्र मत दिलं नाही, परंतु काही चाचण्या करणं आवश्यक आणि त्या जेजे मध्ये होऊ शकत नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं. गोयल यांना जामीन देऊ नयं. पोलीस संरक्षणात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार होऊ शकतात, असं ईडीनं म्हटलंय. 

वकिलांनी काय म्हटलं 

गोयल यांचे वकील अबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला की जेजे रुग्णालयाच्या बोर्डानं खाजगी वैद्यकीय अहवाल खरा असल्याची पुष्टी केली आहे आणि गोयल यांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा अधिकार आहे. गोयल यांना त्यांना हव्या त्या ठिकाणी उपचार घेण्याचा अधिकार असल्याचं सांगत वकिलांनी सहा महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मागितला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार आहे.

टॅग्स :जेट एअरवेजन्यायालयहॉस्पिटल