मुंबई- आर्थिक संकटांत सापडलेल्या जेट एअरवेजनं कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीला या अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी संस्थापक नरेश गोयल यांनी आता आशियातील काही श्रीमंत व्यक्तींकडे मदत मागितल्याचीही चर्चा आहे. त्यात रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि टाटा ग्रुपचे संस्थापक रतन टाटा त्यांना मदत करण्यासाठी पुढे आल्याचंही या प्रकरणाशी संबंधित अधिका-यानं सांगितलं आहे.
गोयल यांच्याकडे जेट एअरवेजची 51 टक्के भागीदारी आहे. तर अबुधाबीतल्या एतिहाद एअरवेजकडे जेटचे 24 टक्के शेअर्स आहेत. जेट एअरवेजची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एतिहाद कंपनीनं मदतीचा हात दिला आहे. परंतु तरीही जेट एअरवेज आर्थिक संकटातून बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे. त्यासाठीच जेट एअरवेजला आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि रतन टाटांना मदतीची अपेक्षा आहे. जेट एअरवेजमध्ये टाटा सन्स भागीदारी होण्यास तयार आहे. पण त्यांना नरेश गोयल यांच्याकडे असलेले सर्वाधिक हवे आहेत.
टाटा सन्सचे आधीच इतर विमान कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत. त्यामुळेच टाटा सन्सला जेट एअरवेजचे सर्वाधिकार हवेत. परंतु टाटा सन्सनं हे वृत्त फेटाळलं आहे. तर मुकेश अंबानीच्या रिलायन्सकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नरेश गोयल यांनी या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी मुकेश अंबानींकडेही मदत मागितल्याची चर्चा आहे. परंतु रिलायन्स ग्रुपकडून अद्यापही याला दुजोरा मिळालेला नाही. कंपनी व्यवस्थापनाने तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास प्रारंभ केल्याने व्यवस्थापनाची टांगती तलवार मानेवर असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वरिष्ठ पातळीवरील अधिकारी, इन फ्लाइट विभागाचे व्यवस्थापन पाहणारे मध्यम वर्गातील अधिकारी व केबिन क्रू अशा सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा फटका बसू लागला आहे. प्रति महिना 2 ते अडीच लाख, सव्वा ते दीड लाख व 70 ते 85 हजार वेतन असलेल्या या कर्मचाऱ्यांना अवघ्या 15 दिवसांची नोटीस देऊन काम थांबवण्याचे निर्देश देण्यात येत असल्याने जेटच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. विशेष म्हणजे यामध्ये कायम कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंधार दाटला आहे.
जेट सेट गो... रतन टाटा, मुकेश अंबानी मिळून 'उडवणार' 'जेट'चं विमान!
आर्थिक संकटांत सापडलेल्या जेट एअरवेजनं कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:56 AM2018-10-29T09:56:26+5:302018-10-29T09:56:36+5:30