नवी दिल्ली: जेट एअरवजेची उड्डाणं आज रात्रीपासून बंद होणार आहेत. बँकांनी 400 कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्यानं जेट एअरवेजची सेवा केली जाणार आहे. आज रात्री 10.30 वाजता जेट एअरवेजचं विमान मुंबईहून अमृतसरसाठी उड्डाण करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर जेट एअरवेजचं विमान उड्डाण करणार नाही.
कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजनं बँकांकडे 400 कोटींची मदत मागितली होती. मात्र बँकांनी जेट एअरवेजला मदत नाकारली. त्यामुळे आज रात्री 12 पासून जेट एअरवेजची विमानं उड्डाण करणार नाहीत. जेट एअरवेज संकटात सापडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत आंदोलन केलं होतं.
गेल्या आर्थिक वर्षात जेट एअरवेजला 4 हजार 244 कोटींचं नुकसान सहन करावं. कंपनीनं जानेवरीपासून वैमानिकांना, अभियंत्यांना, व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन दिलेलं नाही. या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना अंशत: वेतन दिलं जात होतं. मात्र त्यांनाही मार्च महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. कधीकाळी देशातील अव्वल विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजची पाचपेक्षा कमी विमानं सध्या उड्डाण करत आहेत. त्यांचीही सेवा आज रात्रीपासून बंद होईल. कंपनीनं सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणंदेखील रद्द केली आहेत.
जेट एअरवेज जमिनीवर; आज रात्रीपासून उड्डाणं थांबणार
बँकांनी मदत न दिल्यानं जेट एअरवेजची सेवा बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:46 PM2019-04-17T18:46:23+5:302019-04-17T19:07:29+5:30