मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कथित आरोपावरून चौकशी सुरू केली आहे. गेल्या वर्षी या प्रकरणी तपास केल्यानंतर आता ईडीने ही चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या विभागीय कार्यालयात परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम कायद्यांतर्गत (फेमा) गोयल यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
गोयल यांच्या मुंबईतील निवासस्थानासह, त्यांच्या कंपन्या, संचालक आणि जेट एअरवेजच्या कार्यालयांसह सुमारे डझनभर ठिकाणी ईडीने आॅगस्ट महिन्यात छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.गोयल यांच्या वेगवेगळ्या १९ खासगी कंपन्या असून यातील पाच कंपन्या विदेशात नोंदणीकृत आहेत. या नोंदणीकृत कंपन्यांच्या माध्यमातून विक्री, वितरण आणि आॅपरेटिंग खर्चाच्या व्यवहारांमध्ये संशयास्पद व्यवहार करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आल्याचे समजते.बनावट खर्चाचा ताळेबंद आणि अधिक खर्च दाखविला गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, सक्तवसुली संचालनालयाकडूनया प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.