Railways Passenger : देशात रेल्वे प्रवास सर्वात स्वस्त आणि मस्त समजला जातो. त्यामुळेच देशातील निम्म्याहून जास्त लोक आजही रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही रेल्वे प्रवास केला असेल तर प्रवासातील अनेक किस्से आत्ताही तुम्हाला चांगले आठवत असतील. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. एक टीटी (तिकीट तपासनिक) झाशी विभागात धावणाऱ्या ट्रेनची तपासणी करत होते. त्याचवेळी एका सीटवर बसलेला एक प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. टीटीने परिसरातील सर्व प्रवाशांची तपासणी करून नंतर त्या प्रवाशाकडून तिकीट मागितले. मात्र, त्याने दुर्लक्ष केलं. त्याने हेडफोन लावल्याचे समोर आले. शेजारी बसलेल्या प्रवाशांनी टीटी तिकीट मागत असल्याचे सांगितल्यावर तो म्हणाला फक्त दोन मिनिटे थांबा, दुप्पट दंड देतो. हे ऐकून टीटीलाही धक्का बसला. नेमकं हा मोबाईलमध्ये काय करतोय? याची उत्सुकता सर्वांना लागली. नंतर ठरल्याप्रमाणे त्याने दंड भरला. मात्र, त्याचे कारण, ऐकून प्रवाशांसह टीटीनेही डोक्याला हात लावला.
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या फुकट्यांना पकडण्यासाठी झाशी रेल्वे विभागात मोहिम राबवण्यात आली. यामध्ये विनातिकीट प्रवास, अवैध मालाची वाहतूक, परिसर अस्वच्छ करणाऱ्यांना तपासणीदरम्यान पकडण्यात आले. त्यामुळे चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माम झाले होते. यादरम्यान, ८१ प्रवाशांकडून तब्बल ४८५६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यावेळी आरक्षण डब्यातील एक प्रवाशी मोबाईलवर व्यस्त होता. टीटीने तिकीट मागितल्यावर दुप्पट दंड देतो. पण, २ मिनिटांचा वेळ मागितला. तरुणाच्या या वक्तव्याने टीटीला देखील कारण जाणून घ्यायचे होते. त्यामुळे ते थांबले. दोन मिनिटांनंतर त्याने मोबाईल बंद केला आणि म्हणाला, स्टेशनवर पोहोचताच ट्रेनची घोषणा झाली, त्यामुळे मी तिकीट काढू शकलो नाही. किती दंड भरावा लागेल ते सांगा.
प्रवाशाचं कारण ऐकून टीटीने लावला डोक्याला हात
हे ऐकून टीटीने कारण विचारले. त्यावर त्याने मोबाईलवर लुडो खेळत असल्याचे सांगितले. खेळात तो जिंकण्याच्या जवळ होता. जर तो जिंकला असता तर त्याला भरपूर पैसे मिळाले असते. त्यामुळे त्याने २ मिनिटांचा वेळ मागितला. हे ऐकून शेजारी बसलेल्या प्रवाशांनीही डोक्याला हात लावला. मात्र, टीटीने त्याच्याकडून केवळ विहित दंड घेतला.