Join us  

झारखंडमध्ये तसर रेशमी साड्यांच्या उत्पादनास प्रारंभ, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 6:10 AM

Tassar silk sarees : झारखंड सरकारच्या पुढाकारानंतर आता झारखंडमध्येच तसर रेशमापासून आकर्षक साड्यांचे उत्पादन सुरू झाले आहे.

रांची : तसर रेशमाच्या उत्पादनात झारखंड अनेक दशकांपासून आघाडीवर असला तरी या धाग्यांपासून येथे साड्यांची निर्मिती होत नव्हती. इतर राज्यांतील विणकर तसर रेशमापासून सुंदर साड्या बनवीत असत. झारखंड सरकारच्या पुढाकारानंतर आता झारखंडमध्येच तसर रेशमापासून आकर्षक साड्यांचे उत्पादन सुरू झाले आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तसर साडी उत्पादनासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या आदेशानंतर राज्याच्या खादी बोर्डाने चांडील येथे उत्पादन व प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तेथे आता तसर साड्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. या साड्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे मानले जात आहे. सध्या येथील उत्पादन मर्यादित स्वरूपात घेतले जात आहे.

 तथापि, आमदा आणि कुचाई येथील उत्पादन व प्रशिक्षण केंद्रांतही उत्पादन करण्याची योजना आहे. यातून उत्पादन वाढेल तसेच राज्यातील विणकरांना मोठा रोजगार उपलब्ध होईल. राज्यात रोजगार निर्मिती वाढावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 

कुचाईचे तसर रेशीम गुणवत्तेत अधिक श्रेष्ठ- एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, झारखंडच्या कुचाई भागातील तसर रेशीम गुणवत्तेच्या बाबतीत अधिक श्रेष्ठ असल्याचे मानले जाते. 

- हेच तसर सध्या साड्यांच्या उत्पादनासाठी वापरले जात आहे. चांडील येथील केंद्रात एक साडी विणण्यास सुमारे तीन दिवस लागतात.

- येथील साड्यांचे डिझाईन अत्यंत आकर्षक आहे. यातून विणकरांना चांगली कमाई होईल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :झारखंडव्यवसाय