नवी दिल्ली
रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) पत्र लिहून वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल कंपनीविरोधात तक्रार केली आहे. वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप जिओने केला आहे. ट्रायच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगत जिओने या दोन्ही कंपन्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
उत्तर भारतातील विविध भागांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलने चुकीच्या मार्गांचा अवलंब केल्याचं जिओनं ट्रायला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनातून निर्माण झालेल्या जनतेच्या संतापाचा फायदा उचलत दोन्ही कंपन्या खोटा प्रचार करत असल्याचं जिओचं म्हणणं आहे. याआधी २८ सप्टेंबर रोजीही ट्रायला पत्र लिहून याबाबतचा खुलासा केला होता. तरीही या कंपन्यांकडून अजूनही खोटा प्रचार सुरुच असल्याचं जिओ कंपनीकडून पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्या आपल्या कर्मचारी, एजंट्स आणि रिटेलर्सच्या माध्यमातून रिलायन्सविरोधात खोटी मोहीम राबवत आहेत, असा आरोप जिओने केला आहे. ग्राहकांना चुकीच्या पद्धतीनं प्रलोभनं देऊन जिओचं सिम पोर्ट करण्याचा प्रयत्न केला जात असून यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ देखील पुरावे म्हणून जिओने ट्रायकडे सोपवले आहेत.
जिओ कसं शेतकरी विरोधी आणि स्वत: शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं दाखवून शेतकरी आंदोलनाला हवा देण्याचं काम या कंपन्या करत असल्याचं जिओनं म्हटलं आहे. यामुळे रिलायन्स जिओची प्रतिम मलिन होत असल्याचीही तक्रार कंपनीने केली आहे.