Disney Jio merger: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणखी एका क्षेत्रात बादशाह बनणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा मीडिया व्यवसाय जिओ सिनेमा (Jio Cinema) यांच्यात विलीनीकरणाचा करार झाला आहे. दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरणासाठी करार केला असल्याची माहिती ब्लूमबर्गनं या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या आधारे दिली आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दोघांकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
या विलीनीकरणानंतर तयार झालेल्या युनिटमध्ये मुकेश अंबानी यांची ६१ टक्के भागीदारी असेल, असं अहवालात म्हटलं आहे. त्याचवेळी भारतात वाढत्या स्पर्धेमुळे डिस्ने आपले मूल्यांकन वाढवत आहे. या संपूर्ण प्रकरणी रिलायन्स किंवा डिस्नेनं कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही. रिलायन्सनं जिओच्या माध्यमातून थेट स्पर्धा सुरू केल्यानंतर डिस्नेच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या. आयपीएलचं डिजिटल अधिकार घेतल्यानंतर रिलायन्सची स्थिती आणखी चांगली झाली. रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज या विलीनीकरण युनिटमध्ये ६१ टक्के हिस्स्यासाठी १.५ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करेल.
टाटांची ही कंपनी खरेदी करणार?
रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज टाटा प्ले लिमिटेडचं अधिग्रहण करण्याचाही विचार करत आहे. टाटा समूहाच्या या कंपनीत डिस्नेचा हिस्सा आहे. सध्या टाटा प्लेमध्ये टाटा सन्सचा एकूण हिस्सा ५०.२० टक्के आहे. त्याच वेळी, डिस्ने आणि सिंगापूरची गुंतवणूक कंपनी Teamsek यांच्याकडे उर्वरित हिस्सा आहे.