JioHotstar : तुम्ही जर ओटीटी प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. वायकॉम18 चा जिओ सिनेमा आणि स्टार इंडियाचा Disney+Hotstar आजपासून JioHotstar बनले आहेत. वायकॉम18 आणि स्टार इंडियाच्या यशस्वी विलीनीकरणानंतर, दोन्ही कंपन्यांचा नवीन संयुक्त उपक्रम १४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाला आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, ५० कोटींहून अधिक वापरकर्त्यांसाठी जवळपास ३ लाख तासांचे मनोरंजन, खेळांचे थेट प्रक्षेपणाची मेजवानी असणार आहे. दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म मर्ज झाल्याचा ग्राहकांना कसा फायदा होणार? असा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच आला असेल.
सध्या JioHotstar सदस्यत्व योजनेची सुरुवातीची किंमत १४९ रुपये दरमहा आहे. निवेदनात म्हटले आहे की जिओ सिनेमा आणि डिस्ने + हॉटस्टारचे विद्यमान ग्राहक जियोहॉटस्टारमध्ये त्यांचे विद्यमान प्लॅन (सदस्यता) सहजपणे वापरू शकतील.
जियोहॉटस्टारवर मिळणार क्रिकेट वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद
जिओहॉटस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी (डिजिटल), किरण मणी म्हणाले, “जिओहॉटस्टार सर्व भारतीयांसाठी उत्तम मनोरंजन उपलब्ध करून देईल. मनोरंजन हा आता विशेषाधिकार नसून सर्वांसाठी सारखाच अनुभव मिळणार आहे.” जियोहॉटस्टार डिस्ने, एनबीसी युनिव्हर्सल पीकॉक, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी एचबीओ आणि पॅरामाउंटसह हॉलिवूडमधील सर्वोत्तम कंटेन्ट प्रेक्षकांना उपलब्ध करुन देणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. आयसीसी इव्हेंट्स, आयपीएल आणि डब्ल्यूपीएल सारख्या क्रिकेट स्पर्धा देखील या व्यासपीठावर प्रसारित केल्या जातील.
जियोहॉटस्टारमध्ये ग्राहकांना काय मिळणार?
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आणि इतर क्रिकेट स्पर्धांसह बीसीसीआय, आयसीसी आणि राज्य संघटनांचे कार्यक्रम, प्रीमियर लीग, विम्बल्डनसह इतर क्रीडा स्पर्धा आणि प्रो कबड्डी आणि इंडियन सुपर लीग (ISL) सारख्या देशांतर्गत स्पर्धा देखील प्रसारित केल्या जातील. जिओहॉटस्टारचे सीईओ संजोग गुप्ता म्हणाले, “भारतातील खेळ हा केवळ एक खेळ नाही, तर तो उत्कटता, अभिमान आणि सामायिक अनुभव आहे, जो कोट्यावधी भारतीयांना एकत्र आणतो. JioHotstar सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, पोहोच आणि नाविन्य यांचा मेळ घालून चाहत्यांसाठी लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये क्रांती घडवत आहे.”