Join us  

डिमर्जरनंतर Jio Financial बनली २० अब्ज डॉलर्सची कंपनी; टाटा आणि अदांनींना टाकलं मागे, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 1:54 PM

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडची रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्जरची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडची (Jio Financial Services Limited) रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डिमर्जरची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. मुकेश अंबानींच्या या वित्तीय सेवा कंपनीचं डिमर्जर होण्यापूर्वी, एनएससीनं एक विशेष प्री-ओपन सेशन आयोजित केले होतं. यावेळी, जिओ फायनान्शियलची प्राईज डिस्कव्हरी झाली आणि त्याच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित झाल्यानंतर कंपनीची व्हॅल्यू 20 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. या मूल्यांकनामुळे कंपनी अदानी समूहाच्या कंपन्या, कोल इंडिया आणि इंडियन ऑइलच्याही पुढे गेली आहे. बाजारात डिमर्जर होताच कंपनीच्या शेअरची किमती विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.

जेएफएसच्या शेअरची किंमत विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा 160-190 रुपयांनी अधिक आहे. भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक रिलायन्स शेअरसाठी जेएफएसचा एक शेअर मिळेल. हे निफ्टी 50 सह प्रमुख भारतीय निर्देशांकांमध्ये समाविष्ट केले जाईल, परंतु लिस्टिंग होईपर्यंत त्यात ट्रेड होणार नाही. याचा अर्थ जेएफएसएल शेअर्स नजीकच्या काळात ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील.

असं निश्चित झालं मूल्यरिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची बुधवारी बाजार बंद होतानाची किंमत 2,841.85 रुपये आणि गुरुवारी बाजारात नियमित व्यवहार सुरू होण्यापूर्वी आयोजित एक तासाच्या विशेष सत्राच्या अखेरची किंमत 2,580 रुपयांमधील फरक म्हणजे 261.85 रुपये निश्चित करण्यात आला आहे. या आधारावर जेएफएसएलच्या शेअर्सचे एकूण मूल्य 1,66,000 कोटी रुपये म्हणजेच 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असेल.

देशातील 32 वी मौल्यवान कंपनीया मार्केट कॅपसह, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही मार्केट कॅपनुसार देशातील 32 वी सर्वात मौल्यवान कंपनी बनेल. अशाप्रकारे ती अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, टाटा स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, इंडियन ऑइल आणि बजाज ऑटो यांनाही मागे टाकेल. जेएफएसकडे रिलायन्सचे सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे ट्रेझरी शेअर्स देखील आहेत. "रिलायन्स इंडस्ट्रीजदेखील तेजीनं पुढे जाईल, कारण जेएफएस अनलॉकिंग आता सुरुवात आहे. शेअरधारकांनाही याचा फायदा होईल कारण रिटेल आणि टेलिकॉमच्या वाढीसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. यामुळे गुंतवणूकदारांमध्येही विश्वास आलाय," अशी प्रतिक्रिया इक्विनॉमिक्सचे रिसर्च हेड जी. चोकालिंगन यांनी एका न्यूज रिपोर्टद्वारे दिली.

टॅग्स :गौतम अदानीटाटामुकेश अंबानीरिलायन्स