Join us

Jio Financial Services : फायनान्सच्या जगात Jio चा दबदबा वाढला, RBI ची 'या' कामाला मंजुरी, गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 3:24 PM

Jio Financial Services RBI : मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीला मोठं यश मिळालं आहे. पाहा रिझर्व्ह बँकेनं कशासाठी दिली त्यांना परवानगी

Jio Financial Services RBI : मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीला मोठं यश मिळालं आहे. जिओ पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (जेपीएसएल) या कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीनं शेअर बाजारांना माहिती दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ऑनलाइन पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यास रिझर्व्ह बँकेकडून (RBI) मान्यता मिळाली आहे. या बातमीमुळे जिओ फायनान्शियलच्या शेअरवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या आहेत. कामकाजादरम्यान, कंपनीच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली असून शेअर ३२७ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कंपनीच्या शेअरचा ५२आठवड्यांचा उच्चांक ३९५ रुपये आहे.

फिनटेक कंपनी पेटीएमला आरबीआयकडून नियामक कारवाईला सामोरं जावं लागत असताना ही मंजुरी देण्यात आली आहे. अशा वातावरणात जिओला डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस मार्केटमध्ये हिस्सा मिळवण्याची संधी आहे. जिओ पेमेंट्स बँक ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा भाग आहे. सध्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि फिजिकल डेबिट कार्डसह डिजिटल बचत खाती उपलब्ध आहेत. त्यांचे १५ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत.

नुकतंच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं आपलं नवीन आणि सुधारित जिओ फायनान्स अॅप लाँच करण्याची घोषणा केली आहे. या अॅपचं बीटा व्हर्जन ३० मे २०२४ रोजी लाँच करण्यात आलं होतं. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) जिओ फायनान्स लिमिटेडनं ते होमलोनची सेवा सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं. तसंच याची चाचणी (बीटा) म्हणून सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय कंपनी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज सारखी इतर उत्पादनंही सादर करणार आहे.

कसे होते सप्टेंबर तिमाहीचे निकाल?

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा निव्वळ नफा सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत तीन टक्क्यांनी वाढून ६८९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ६९४ कोटी रुपये झालं. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ६०८ कोटी रुपये होता. मात्र, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील खर्च ७१ कोटी रुपयांवरून दुपटीनं वाढून १४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :जिओभारतीय रिझर्व्ह बँक