Join us

Jio Financial Services बनणार कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी, RBI ची मंजुरी; वर्षभरात शेअर ५०% नी वधारला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 2:07 PM

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये रुपांतरित करण्यास मान्यता मिळाली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीकडून (एनबीएफसी) कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये (CIC) रुपांतरित करण्यास मान्यता मिळाली आहे. कंपनीनं शेअर बाजारांना याबाबत माहिती दिली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) वित्तीय सेवा शाखा असलेल्या जिओ फायनान्शियलने नोव्हेंबरमध्ये सीआयसीसाठी अर्ज केला होता. आरआयएलपासून जिओ फायनान्शिअलवेगळे झाल्यानंतर आणि त्याच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये बदल झाल्यानंतर आरबीआयनं रूपांतरणाचे निर्देश दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं.

सीआयसी एक होल्डिंग संस्था म्हणून कार्य करते जी प्रामुख्याने आपल्या समूह कंपन्यांचे शेअर्स आणि सिक्युरिटीजचे व्यवस्थापन करते. या बदलामुळे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस विविध संस्थांच्या अंतर्गत कर्ज, मालमत्ता व्यवस्थापन, विमा इत्यादींसह आपल्या विविध व्यवसायांमध्ये सुसूत्रता आणता येणं शक्य आहे. पारंपारिक एनबीएफसीच्या विपरीत, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या उपकंपन्या पेरोल आणि इन्शुरन्सपासून ते मालमत्ता व्यवस्थापन आणि कर्ज देण्यापर्यंत विविध कार्ये करतात. ही भिन्नता शुद्ध-प्ले एनबीएफसीसाठी परिभाषित केलेल्या श्रेणींशी सुसंगत नाही.

किती असावी असेट साईज?

रेग्युलेटरी व्याख्येनुसार, सीआयसीची मालमत्ता १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. तसंच निव्वळ मालमत्तेपैकी किमान ९० टक्के रक्कम इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, बाँड्स, डिबेंचर किंवा ग्रुप कंपन्यांमधील कर्ज अशा गुंतवणुकीत ठेवणं आवश्यक आहे. सीआयसी म्हणून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आपल्या उपकंपन्यांना कार्यक्षमतेनं भांडवल वाटप करण्यावर लक्ष केंद्रित करू शकते.

शेअरमध्ये तेजी

आरआयएलपासून वेगळी झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ऑगस्ट २०२३ मध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट झाली होती. १२ जुलै रोजी शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. सकाळी बीएसईवर हा शेअर ३५३.५५ रुपयांवर उघडला आणि त्यानंतर २.४ टक्क्यांनी वधारून ३५६.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र त्यानंतर कामकाजादरम्यान त्यात थोडी घसरण दिसून आली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वित्तीय सेवा व्यवसाय वेगळे केल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस २१ ऑगस्ट २०२३ रोजी लिस्ट झाली. कंपनीचे शेअर्स २६५ रुपयांवर लिस्ट झाले. सध्या कंपनीचा शेअर ३५० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. या वर्षी स्टॉक जवळपास ५० टक्क्यांनी वधारलाय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानी