Join us

जिओ फायनॅन्शिअलचं होणार डिमर्जर, तुम्हीदेखील घेऊ शकता शेअर्स; 'ही' तारीख केली निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:21 AM

Reliance Strategic Investments Demerger : ईशा अंबानी, राजीव महर्षी यांच्याकडे मोठी जबाबदारी

Reliance Strategic Investments Demerger : मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आपली वित्तीय सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट डिमर्ज करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं शनिवारी शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेतून ही माहिती समोर आली आहे. कंपनीच्या डिमर्जरची तारीख १ जुलै निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर नवीन कंपनीचे शेअर्सच्या वाटपासाठी २० जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. डिमर्जर पूर्ण झाल्यानंतर, नवीन कंपनीचे नाव जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेस (Jio Financial Services) असेल. या डिमर्जरला गेल्या महिन्यात नियामकानं मंजुरी दिली होती. यानंतर शुक्रवारी बोर्डाच्या बैठकीत रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली.

ईशा अंबानी संचालक मंडळातईशा अंबानी आणि माजी कॅग राजीव महर्षी यांचा या कंपनीच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आलाय. शुक्रवारी झालेल्या बैठकीत नवीन संचालकांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. माजी गृह सचिव आणि माजी कॅग अशी जबाबदारी पार पाडलेल्या राजीव महर्षी यांना आरएसआयएलमध्ये पाच वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेय, असं कंपनीनं म्हटलं. इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी सुनील मेहता आणि पीडब्ल्यूसीसह काम करणारे चार्टर्ड अकाउंटंट बिमल मनू तन्ना यांचीही स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बँकर हितेश कुमार सेठिया यांची तीन वर्षांसाठी आरएसआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही कंपनीनं म्हटलं.

नव्या कंपनीचा शेअर मिळणाररिलायन्सच्या प्रत्येक शेअरहोल्डरला मूळ कंपनीच्या प्रत्येक शेअरमागे नवीन कंपनीचा एक शेअर मिळेल. या डिमर्जरच्या अंमलबजावणीची तारीख १ जुलै निश्चित करण्यात आली होती. परंतु नवीन कंपनीचे शेअर्स वाटप करण्यासाठी २० जुलै ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे.

काय करणार कंपनी?ही कंपनी ग्राहक आणि व्यावसायिकांना कर्ज देईल. नंतर ते विमा, पेमेंट, डिजिटल ब्रोकिंग आणि असेट्स मॅनेजमेंट सेवा देखील पुरवणार आहे. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीच्या मते, जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे मूल्य १.५२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल. अशा प्रकारे ती भारतातील पाचवी सर्वात मोठी वित्तीय सेवा कंपनी बनेल.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्सव्यवसाय