रिलायन्स जिओनं आपला नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, जो फॅमिली युझर्ससाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कंपनीनं Jio Plus पोस्टपेड प्लॅन सादर केले आहेत, ज्यांची किंमत ३९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही इतर तीन यूजर्स देखील जोडू शकता. म्हणजेच एका रिचार्जमध्ये चार लोकांचे काम होणार आहे.
चार लोकांना जोडणारा Jio चा पोस्टपेड प्लान आधपासून अस्तित्वात असला तरी त्याची किंमत जास्त आहे. त्याच वेळी, या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार कनेक्शन निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मिळते. म्हणजेच, ग्राहक दोन, तीन किंवा चार कनेक्शन जोडू शकतात. त्यानुसार त्यांना किंमत मोजावी लागेल.
Jio ने २९९ रुपये, ३९९ रुपये, ५९९ रुपये आणि ६९९ रुपये किंमतीचे चार नवीन प्लान लॉन्च केले आहेत. हे सर्व प्लॅन २२ मार्चपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. या प्लॅन्सची अधिक माहिती आपण जाणून घेऊ. सर्व प्रथम इंडिव्युज्युअल रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ. याची किंमत २९९ रुपयांपासून सुरू होते, ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, ३०GB डेटा, अमर्यादित एसएमएस सारख्या सुविधा मिळतात. दुसरीकडे, दुसरा प्लान ५९९ रुपयांचा आहे, ज्यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस, डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळते. तुम्ही या प्लॅनची मोफत ट्रायल देखील घेऊ शकता. ग्राहकांना एका महिन्यासाठी हा प्लॅन ट्रायल म्हणून वापरता येईल.
फॅमिली प्लॅन्समध्ये काय ऑफर्स?
आता जिओच्या फॅमिली प्लॅनबद्दल जाणून घेऊ. ३९९ रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगसह ७५GB डेटा, अमर्यादित एसएमएस आणि तीन कनेक्शन अॅड-ऑनची सुविधा मिळते. प्रत्येक अॅड-ऑन कनेक्शनसाठी तुम्हाला अतिरिक्त ९९ रुपये मोजावे लागतील. या प्लॅनची तुम्ही मोफत ट्रायलही घेऊ शकता.
दुसरीकडे, ६९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, १००GB डेटा आणि अमर्यादित एसएमएस सुविधा मिळते. यामध्ये यूजर्सना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळेल. तुम्ही Jio च्या या प्लॅनमध्ये ३ अतिरिक्त कनेक्शन देखील जोडू शकता.
जर तुम्ही नवीन ग्राहक असाल तर सिम ॲक्टिव्हेट करण्यासाठी ९९ रुपये आकारले जातील. याशिवाय तुम्हाला ५०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरावे लागतील. तथापि, तुम्ही Jio Fiber ग्राहक, कॉर्पोरेट कर्मचारी, विद्यमान नॉन-जिओ पोस्टपेड युझर आणि काही अन्य लोकांसाठी सिक्युरिटी डिपॉझिट माफ आहे.