मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) २०१६ मध्ये टेलिकॉम क्षेत्रात धमाकेदार एंट्री केली. त्यामुळे अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले. काही कंपन्यांना टाळं लागलं तर काही अद्यापही त्या धक्क्यातून सावरू शकलेल्या नाहीत.
पण यात भारती एअरटेल ही अशी कंपनी आहे जिनं या स्पर्धेत आपलं स्थान टिकवून ठेवलं. पण हे नक्की झालं कसं? कंपनीचं चेअरमन सुनील मित्तल यांनी जिओला एक मोठं आव्हान मानलंय. परंतु ते म्हणतात की यामुळे आपल्या कंपनीच्या अस्तित्वाला धोका नाही. त्यांच्यासाठी २००३ आणि २०२० चं संकट खूप मोठं होते. त्यावेळी कंपनीचं अस्तित्वच धोक्यात आलं होते. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मित्तल यांनी याबाबत सविस्तरपणे चर्चा केली.
मित्तल म्हणाले की २००३ हा त्यांच्या कंपनीसाठी सर्वात वाईट टप्पा होता. त्यावेळी स्पर्धा ही खूप चुरशीची झाली होती. तेव्हा आमची कंपनी नवी होती. आम्ही त्या स्थितीतून मजबूत होऊन बाहेर आलो आणि IBM, Nokia आणि Ericsson यांच्याशी डील केली. २००८-१० चं संकट सरकारच्या धोरणांमुळे आले. सरकारनं विचार न करता १०-१२ नवीन परवाने दिले. त्यामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या दूरसंचार कंपन्यांच्या अडचणी वाढल्या. आमचा महसूल, नफा प्रभावित झाला. पण ही परिस्थिती २००३ सारखी नव्हती. तोपर्यंत आमची स्थिती मजबूत झाली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एअरटेलला कसं तारलं?२०१६ मध्ये जिओच्या त्सुनामीतून एअरटेलचा बचाव झाला. बाकीच्या कंपन्या त्यात बुडाल्या. एअरटेलने खऱ्या अर्थाने स्वत:ला एका इन्स्टिट्युशनच्या रुपात रूपांतरित केलं आहे, हे यावरून स्पष्ट होतं. २०१६ मध्ये जिओची एंट्री झाली नसती तर आणखी काही कंपन्या आल्या असत्या. देशात पाच-सहा दूरसंचार कंपन्या झाल्या असत्या, असं मित्तल म्हणाले. २००८ मध्येही अनेक नवीन कंपन्या आल्या पण आमच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न नव्हता. आमच्यासाठी २००३ आणि २०२० हे वर्ष २००८ किंवा २०१६ पेक्षा मोठं संकट होतं. २०२० मध्ये, एजीआरवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, असं त्यांनी नमूद केलं.
२०१६ च्या घटनांकडे तुम्ही कसं पाहता, असा प्रश्न मित्तल यांना विचारण्यात आला. यातून काही चांगल्या गोष्टीही समोर आल्या. यामुळे डेटा क्रांतीला वेग आला, डेटाची किंमत कमी झाली आणि नेटवर्क विस्तारले. वाईट भाग असा होता की त्यावेळी पॉलिसी नीट हाताळली गेली नाही. त्यामुळे अनेक कंपन्या स्पर्धेतून बाहेर पडल्या. एअरटेल ही एकमेव बचावलेली कंपनी आहे. एअरटेल ही एक मजबूत संस्था बनली आहे. सखोल बाजार समजून घेणारी आणि मजबूत ग्राहक जोडणारी कंपनी आहे. ती आता ग्राहक केंद्रित कंपनी बनल्याचंही मित्तल म्हणाले.