JioMart Lays Off:मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील JioMart मध्ये मोठी नोकरकपात झाली आहे. कंपनीने एक हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याचे वृत्त आहे. अलीकडे JioMart ने भारतात काम करण्यासाठी मेट्रो कॅश अँड कॅरी व्यवसाय विकत घेतला आहे. करारानंतर कंपनीने कपातीचा निर्णय घेतला आहे. अहवालानुसार, येत्या काही दिवसांत कंपनी मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीचा विचार करत आहे.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, JioMart मधील नोकरकपातीची ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात JioMart आपल्या 15,000 कर्मचार्यांपैकी एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या विचारात आहे. रिपोर्टनुसार, JioMart ने गेल्या काही दिवसांत आपल्या कॉर्पोरेट कार्यालयातील 500 अधिकाऱ्यांसह 1,000 लोकांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. मेट्रो कॅश अँड कॅरीचे 3500 कायमस्वरूपी कर्मचारी जोडल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत ओव्हरलॅपिंग झाले आहे. यामुळे कंपनी मार्जिन सुधारण्याचा आणि तोटा कमी करण्याचा विचार करत आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
FMCG क्षेत्रावर रिलायन्सची नजररिलायन्स रिटेलने मेट्रो कॅश अँड कॅरीचा भारतीय व्यवसाय 2850 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. कंपनीला मंजुरीही मिळाली आहे. मेट्रो कॅश अँड कॅरीची भारतात 3 मिलियन ग्राहकांपर्यंत पोहोच आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG क्षेत्रात आपले पाय पसरण्याच्या तयारीत आहे. मेट्रो कॅश अँड कॅरीचे अधिग्रहण केल्यानंतर रिलायन्स रिटेल - अमृतसर, अहमदाबाद, बंगळुरू, दिल्ली, गाझियाबाद, गुंटूर, हैदराबाद, हुबळी, इंदूर, लखनौ, कोलकाता, मुंबई, नाशिक, सुरत, विशाखापट्टणम आणि विजयवाडा यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो स्टोअरचा वापर करेल.