नवी दिल्ली : सणासुदीचे दिवस सुरू होत असतानाच देशातील खाद्य पोहोच (फूड डिलिव्हरी) उद्योगास मनुष्यबळाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. नवी नोकरभरती अडखळली असतानाच वार्षिक नोकरी धर-सोड (अॅट्रिशन) दर २५० टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे कामगार मोठ्या संख्येने गावाकडे परतल्यामुळे एकूणच पोहोच उद्योगात नोकरी सोडण्याचे प्रमाणात वाढले आहे. खाद्य पोहोच उद्योगात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लॉकडाऊनमुळे पोहोच कंपन्यांकडील मनुष्यबळ ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. सणासुदीच्या हंगामासाठी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी कंपन्यांनी जोरदार भरती सुरू केली आहे. उदा. झोमॅटो आठवड्याला ५ हजार पोहोच भागीदार शोधत आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ ४० टक्क्यांनी वाढविण्याची कंपनीची योजना आहे. झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आगामी काही महिन्यांत स्थिरता येईल, असे आम्हाला वाटते. काही शहरांत सध्याची मागणी कोविडपूर्व काळातील मागणीपेक्षाही जास्त झाली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला मनुष्यबळ हवे आहे. या श्रमिक व्यवस्थापन क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी ‘बेटरप्लेस’चे सीईओ प्रवीण अगरवाल यांनी सांगितले की, ब्ल्यू-कॉलर श्रमिकांचे स्थलांतर वतुळाकार फिरत असते.
विविध सुरक्षा उपक्रम
काही जाणकारांनी सांगितले की, श्रमिकांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक कंपन्यांनी सामाजिक सुरक्षा उपक्रम सुरू केले आहेत. स्विगीने अपघात विमा, वैद्यकीय विमा, ऑन-कॉल डॉक्टरांची सोय, पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि वैयक्तिक कर्जासाठी बँकांशी भागीदारी असे उपक्रम हाती घेतले आहेत.