औरंगाबाद - दोन वर्षांपूर्वी जगभरात झालेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आरोग्यासोबतच मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. या काळात लॉकडाऊनसारखे कठोर उपाय करावे लागल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. दरम्यान, या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या दोन मित्रांनी असं काही केलं की ते दोन वर्षांतच करोडपती झाले.
कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्या काळात आकाश म्हस्के आणि आदित्य कीर्तने या दोन मित्रांचं करिअरसुद्धा संकटात सापडलं. त्यांची नोकरी गेली. त्यानंतर एक महिनाभर त्यांनी पिक्चर बघत टाईमपास केला. त्यानंतर मात्र २५ हजार रुपयांची गुंतवणूक करत त्यांनी मांस विक्री करणारे एक व्हेंचर सुरू केले. मग त्यांचं नशीब असं पालटलं की, दोन वर्षांच्या आतच ही कंपनी त्यांनी तब्बल १० कोटी रुपयांना विकली. अशा प्रकारे कोरोना काळाने त्यांचं नशिबच पालटून टाकलं.
कोरोनाचा फैलाव सुरु झाल्यावर लागलेल्या लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने या तरुणांनी पहिला महिनाभर वेळ चित्रपट बघण्यात घालवला. मात्र लॉकडाऊन सुरू राहिल्याने त्यांची नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.
दरम्यान, एका स्थानिक विद्यापीठामध्ये मांस आणि पोल्ट्री प्रक्रियेसंदर्भातील व्यावसायिक प्रशिक्षणातून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मांसाच्या असंघटित क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी विचार केला. या तरुणांना सुरुवातीला पाठिंबा मिळाला नाही. कुणी आम्हाला मुलगी देणार नाही, अशी भीती घातली. नंतर कुटुंबीय मागे उभे राहिले.
दरम्यान, १०० स्क्वेअर फुटाच्या गाळ्यामधून मित्रांनी दिलेल्या २५ हजार रुपयांच्या भांडवलामधून एपेटाइटी नावाची कंपनी सुरू केली. हळूहळू या कंपनीचा कारभार महिन्याला चार लाख रुपयांच्यावर पोहोचला.
या दोन्ही मित्रांचा व्यवसाय हळूहळू वाढला. यादरम्यान, शहरातील एक कंपनी फॅबी कॉर्पोरेशनची नजर त्यांच्यावर पडली. फॅबीने त्यांच्या एपेटायटी कंपनीमधील बहुतांश हिस्सेदारी १० कोटी रुपयांना खरेदी केली. मात्र आदित्य आणि आकाश हे काही भागीदारीसह या कंपनीशी जोडलेले राहतील.