शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झालेले शार्क अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी आपल्या नवीन स्टार्टअपसाठी १० जानेवारीपासून हायरिंगची सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केलंय. आपल्या स्टार्टअपमध्ये जे पाच वर्षांपर्यंत राहतील त्यांना कंपनीकडून मर्सिडीज कार दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशनीर ग्रोव्हर यांच्या नवीन स्टार्टअपचं नाव 'थर्ड युनिकॉर्न' असं आहे. २०२२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा याबद्दल घोषणा केली होती, तरीही त्याबद्दल कोणतीही अधिक माहिती समोर आली नव्हती.
“चला २०२३ मध्ये काही काम करुया. आम्ही थर्ड युनिकॉर्नमध्ये अतिशय शांततापूर्ण पद्धतीनं एक मार्केटला हादरवणारा व्यवसाय उभा करत आहोत. आतापर्यंत यात कोणत्याही बाहेरच्या गुंतवणूकदाराचा पैसा लागलेला नाही. आम्ही काही हटके गोष्टी करत आहोत,” असं अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलंय.
आपल्या पोस्ट सोबत त्यांनी एक स्लाईड शोदेखील लावला आहे. यामध्ये थर्ड युनिकॉर्न काय तयार करत आहे हे न सांगता कशाप्रकारे कंपनीला उभं केलं जात आहे याची माहिती दिलीये. जर तुम्ही पुढील तोडू फोडू गोष्टीचा भाग बनू इच्छित असाल तर याची झलक तुम्ही पाहू शकता की आम्ही कंपनी कशी उभारत आहोत. आम्ही काय उभारतोय हा लाखो डॉलरचा प्रश्न बनलाय असंही त्यांनी नमूद केलंय.
आणखी काय म्हटलंय?
थर्ड युनिकॉर्न कोणत्याही वेंचर कॅपिटलिस्टकडून फंडिंग घेऊ उभारली जात नाहीये. आम्ही केवळ स्वदेशी आणि आपल्याच पैशांचा वापर करणार आहोत. या टीममध्ये केवळ ५० सदस्यच असंतील असंही अशनीर ग्रोव्हर यांनी स्पष्ट केलं. जो कर्मचारी या कंपनीत ५ वर्षांपर्यंत काम करेल त्याला कंपनीकडून मर्सिडीज कार गिफ्ट म्हणून दिली जाईल, असा दावाही त्यांनी केलाय.