लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक बाजारात मंदीची भीती वाढत असताना जुलै महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेला चार चाँद लागले आहेत. मागणी आणि ऑर्डर वाढल्याने उत्पादनात ८ महिन्यांतील सर्वाधिक तेजी आली आहे, तर मान्सून दमदार झाल्याने बेरोजगारीचा दरही ग्रामीण भागात कमी झाला आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने जुलै २०२२ या महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, कृषी क्षेत्रात पेरणी अधिक झाल्याने देशातील बेरोजगारीचा दर कमी होत ६.८० टक्क्यांवर आला आहे. एक महिना अगोदर जूनमध्ये हा दर ७.८० टक्के होता. कृषी क्षेत्रामुळे ग्रामीण भागात रोजगाराची संधी वाढली असली तरी शहरी क्षेत्रात मात्र बेरोजगारी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या महिन्यात ग्रामीण भागात बेरोजगारी दर कमी होत ६.१४ टक्क्यांवर आला आहे. जूनमध्ये तो ८.०३ टक्के होता.
तरीही का बसतोय फटका?
n देशात अनेक राज्यांत समाधानकारक पाऊस झाला असला तरीही उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्याने भात लागवड १३ टक्क्यांनी कमी झाली आहे.
n जोपर्यंत लागवड आणखी वाढत नाही, तोपर्यंत ग्रामीण भागात रोजगाराची स्थिती सुधारणार नाही, असे सीएमआयईने म्हटले आहे.
शहरी भागाला फटका?
n शहरी भागात बेरोजगारी दर वाढून ८.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये तो ७.८० टक्के होता.
n उद्योग, सेवा क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्यामुळे शहरी भागातील बेरोजगारी वाढली आहे.
n जुलै महिन्यात शहरी भागात रोजगार सहा लाखांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शहरी रोजगारांची संख्या १२.५१ कोटींवर आली आहे.