टाटांची टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाबत मोठा खुलासा झाला आहे. टीसीएसमध्ये नोकरी घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, टीसीएसमध्ये नोकरीच्या मोबदल्यात १०० कोटी रुपयांचं कमिशन घेतल्याचं म्हटलं जातंय. कंपनीनं गेल्या तीन वर्षांमध्ये ५० हजार कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. परंतु आता देण्यात आलेल्या नोकऱ्यांमध्ये गैरव्यवहार झाल्यांच समोर येतंय. दरम्यान काही सीनिअर अधिकाऱ्यांनी हायरिंगच्या मोबदल्यात स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेतल्याचं कंपनीच्या तपासणीत समोर आलं.
या सर्व बाबींचा खुलासा टीसीएसमधूनच झाला आहे. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार या घोटाळ्यामध्ये कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी हायरिंगच्या मोबदल्यात कन्सल्टन्सी स्टाफिंग परफॉर्मन्सकडून मोठं कमिशन घेतल्याचं यात म्हटलंय. या वृत्तानुसार या घोटाळ्यात तब्बल १०० कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे.
कसा झाला खुलासा?टीसीएसमध्ये या नोकरी घोटाळ्याचा खुलासा एका व्हिसलब्लोव्हरनं केलाय. त्यानं टीसीएसचे सीईओ आणि सीओओ यांना यासंदर्भातील माहिती दिली. हायरिंगच्या मोबदल्यात टीसीएसच्या मॅनेजमेंट ग्रुपचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती कंपनीत स्टाफिंग फर्म्सकडून कमिशन घेतलंय आणि अनेक वर्षांपासून हे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. वृत्तानुसार ही देवाणघेवाण १०० कोटींची आहे. टीसीएसचे आरएमजीचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती १९९७ पासून कंपनीसोबत आहेत.
काय झाली कारवाई?व्हिसलब्लोव्हरकडून मिळालेल्या माहितीनंतर कंपनीनं त्वरित टीसीएसच्या मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अझिज मेनन यांच्यासोबत तीन अधिकाऱ्यांची समिती तयार करून चौकशीचे आदेश दिलेत. यानंतर टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपच्या प्रमुखांना सुट्टीवर पाठवण्यात आलंय. तर ४ अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आलाय. याशिवाय तीन स्टाफिंग फर्म्सना ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय. कोणत्या फर्म्सना ब्लॅकलिस्ट केलंय त्याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.