लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: जगभरात कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहेत. यामुळे भारतातील नोकरदार वर्गही हादरला आहे. सुमारे ६५ टक्के म्हणजे प्रत्येक १० पैकी ६ पेक्षा अधिक भारतीयांना नोकरी गमावण्याची भीती वाटत आहे. जॉब पोर्टल ‘इंडिड’ने जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
जगभरातील रोजगार बाजारात सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. ॲमेझॉन, फेसबुक आणि गुगल यांसारख्या बड्या कंपन्याही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करीत आहेत. कर्मचारी कपातीची टांगती तलवार डोक्यावर असल्याने कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या कामावरही प्रतिकूल परिणाम होत आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने ते कामात नीट लक्ष देऊ शकत नाही, असेही आढळले आहे. ‘इंडिड इंडिया’चे विक्री प्रमुख शशीकुमार यांनी सांगितले की, कर्मचारी आता मानसिक आरोग्य आणि काम व जगणे यांच्यातील योग्य समतोलास प्राधान्य देत आहेत.
जगातील घडामोडींचा भारतावर परिणाम काय?
- अमेरिकेतील आयटी सेक्टरमधील ७३ हजार कर्मचाऱ्यांच्या नाेकऱ्या गेल्या. भारतात सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आले आहे.
- ट्विटर, मेटा, गुगल, ॲपल, बायजूस, ॲक्सेंचर, सिस्काे इत्यादी यांनी माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कमी केले. ट्विटरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचीही नाेकरी गेली.
- या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होतो, याकडे तज्ज्ञांचे लक्ष आहे.
२०२३ मध्ये स्थिती सुधारण्याची शक्यता
कंपन्या २०२३ मधील आपल्या नोकर भरतीबाबत आशावादी आहेत. ४५ टक्के कंपन्यांना वाटते की, पुढील वर्षी नोकरभरतीत २० टक्के वाढ होऊ शकते. १८ टक्के कंपन्यांना महागाईची, तर १५ टक्के कंपन्यांना नोकर कपातीची चिंता वाटत आहे. २०२३ मध्ये कंपन्या अधिकाधिक लोकांना नोकरी देण्यास इच्छुक असतील.
नोकर भरतीत ‘एआय’चा वापर होणार
अहवालात म्हटले आहे की, नोकर भरतीसाठी कंपन्या आधुनिक साधनांचा वापर करू इच्छित असल्याचे आढळून आले आहे. ३५% कंपन्या कर्मचारी भरतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच डिजिटल व समाजमाध्यमांचा वापर करण्यास इच्छुक आहेत. २६% कंपन्या ‘हायपर लोकल’ लोकांना बोर्डात सहभागी करून घेऊ इच्छितात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"