Join us

Jobs: नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण वाढले; नोकरीची संधी वाढली, आयटी क्षेत्रात ५० हजार जणांना मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:04 AM

Jobs: देशातील बड्या आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नवीन कामाच्या ऑर्डर्स मिळत असल्यामुळे जूनच्या तिमाहीत या कंपन्यांनी ५० हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

नवी दिल्ली : देशातील बड्या आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नवीन कामाच्या ऑर्डर्स मिळत असल्यामुळे जूनच्या तिमाहीत या कंपन्यांनी ५० हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. वास्तविक कर्मचाऱ्यांचे वाढलेले नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण (कर्मचारी पलायन), नफ्याचा दबाव आणि मनुष्यबळावरील वाढता खर्च यामुळे आयटी कंपन्यांसमोर कर्मचाऱ्यांशी संबंधित आव्हाने वाढली आहेत. असे असतानाही कंपन्यांमधील भरती तेजीत असल्याचे दिसून आले आहे.जाणकारांच्या मते, जोपर्यंत तयार मनुष्यबळ उल्लेखनीयरीत्या वाढत नाही तोपर्यंत गुणवत्तापूर्ण कर्मचाऱ्यांची खेचाखेची सुरूच राहील. अलीकडे आयटी कंपन्यांबरोबच बिगर-तंत्रज्ञान कंपन्याही आयटी व्यावसायिकांची भरती करताना दिसत आहेत. कारण डिजिटल जगात ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते गरजेचे झाले आहे.

आगामी ५ वर्षांत आयटी क्षेत्रात ६० लाख नवीन रोजगार उपलब्ध होतील. सध्याच्या वातावरणात कर्मचारी खुश आहेत. दुसरीकडे कंपन्यांना मात्र मनुष्य बळ टिकविताना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. येणाऱ्या काळात कंपन्यांवर नफा टिकविण्याचा दबावही राहील. कारण सौद्यांचा आकार वाढेनासा झाला आहे.    - सुनील सी., मुख्य कार्यपालक     अधिकारी, टीमलीज डिजिटल   

आयटी कंपन्यांची कर्मचारी भरती आता कोविडपूर्व पातळीवर पोहोचली आहे. काही बाबतीत तर त्यापेक्षाही अधिक झाली आहे.    - वाम्सी कारावडी,     संचालक, डेलॉयट इंडिया 

टॅग्स :नोकरीकर्मचारी