नवी दिल्ली : सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत देशातील रोजगारात वार्षिक १४ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. नोकर भरती क्षेत्रातील संस्था मायकल पेज इंडियाने ही माहिती दिली आहे. कंपन्यांच्या नोकर भरतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के वाढ झाली आहे, असेही मायकल पेजने म्हटले आहे.
मायकल पेजचे व्यवस्थापकीय संचालक निकोलस डुमोलिन यांनी सांगितले की, सप्टेंबरच्या तिमाहीत अभियांत्रिकी, वस्तू उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या सर्वाधिक संधी निर्माण झाल्या. कंपन्यांच्या नोकर भरतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के वाढ झाली आहे. कोविडपश्चात काळात कंपन्या नोकर भरतीचे निर्णय अधिक गतीने घेत आहेत. एचआर आणि बिगर आयटी भरतीतही वाढ झाली. मार्चच्या तिमाहीत नोकर भरतीत वाढीला सुरुवात झाली.
अहवालानुसार, अभियांत्रिकी व वस्तू उत्पादन क्षेत्रातील रोजगारात सर्वाधिक वाढ दिसून आली. तंत्रज्ञान क्षेत्रात ५८ टक्के वाढ दिसून आली. विधि क्षेत्रात ३५ टक्के, तर मनुष्यबळ विकास क्षेत्रात २५ टक्के वाढ दिसून आली. तिमाही आधारावर अभियांत्रिकी व वस्तू उत्पादन क्षेत्रातील रोजगारात २० टक्के वाढ दिसून आली. यातील सर्वाधिक भरती मार्केटिंग पदांसाठी करण्यात आली. दुसऱ्या स्थानी तंत्रज्ञान पदे राहिली. कोविड साथीच्या सुरुवातीला मार्केटिंग क्षेत्रातील नोकऱ्या घटल्या होत्या. त्यामध्ये आता वाढ होऊ लागली आहे.
रिक्त जागा भरणे सुरू
जून २०२१ नंतर कंपन्यांचे कामकाज पुन्हा सुरू होऊ लागले. रिक्त जागा भरण्याची गरज निर्माण होऊ लागली. स्टार्टअप इको सिस्टीममध्ये नोकर भरती वाढल्यानंतर आयटीतील नोकऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते.