नवी दिल्ली : तरुणांना नाेकऱ्या देण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते ७१ हजार तरुणांना नाेकरीचे नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. मंगळवारी ते व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे नियुक्तिपत्र देतील.
पंतप्रधानांनी दिवाळीच्या वेळेस राेजगार मेळाव्यामध्ये ७५ हजार तरुणांना नियुक्तिपत्र दिले हाेते. त्यानंतर, विविध मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांना दीड वर्षांमध्ये भरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता दुसऱ्या राेजगार मेळाव्यात माेदी यांच्या हस्ते नागपूर, पुणे, पणजी, गुवाहाटी, रांची, नवी दिल्ली इत्यादी शहरांतील तरुणांना नियुक्तिपत्र देण्यात येईल. नियुक्ती पत्र देण्यापूर्वी पंतप्रधान माेदी हे तरुणंसाेबत संवाद साधणार आहेत. नियुक्ती पत्र दिल्यानंतर ‘कर्मयाेगी प्रारंभ’ या उपक्रमालाही सुरूवात करण्यात येणार आहे. नियुक्ती पत्र दिलेल्या तरुणांना याद्वारे प्रशिक्षित करण्यात येईल.
राेजगार मेळाव्याच्या दुसऱ्या टप्प्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण या चेन्नई येथून तर परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नागपूर येथून सहभागी हाेणार आहेत. याशिवाय इतर मंत्रीदेखील विविध ठिकाणांहून सहभागी हाेणार आहेत. विविध केंद्रीय सरकारी कार्यालयांमधील १० लाख रिक्त पदे पुढील दिड वर्षांमध्ये भरण्यात येणार असून त्यासाठी माेहिम हाती घेण्यात आली आहे.