Mukesh Ambani News : जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉक इंक (Blckrock Inc) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसोबत (Jio Financial) भारतात खाजगी क्रेडिट व्हेंचर सुरू करण्यासाठी बोलणी करत आहे. भारतातील थेट कर्जाच्या वाढत्या संधींचा लाभ घेण्याचा त्यांचा उद्देश आहे.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं हा दावा करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही कंपन्यांचा ५०-५० टक्के हिस्सा असेल आणि ते स्टार्टअप्सपासून बड्या कंपन्यांनादेखील कर्ज देतील. जर हा करार झाला तर रिलायन्स आणि अमेरिकेची ब्लॅकरॉक यांच्यातील हे तिसरं व्हेन्चर असेल. यापूर्वी दोन्ही कंपन्यांनी असेट मॅनेजमेंट आणि स्टॉक ब्रोकिंग व्यवसायासाठी हातमिळवणी केली आहे.
या कंपन्यांचा तेजीनं विस्तार
अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट, सर्बरस कॅपिटल मॅनेजमेंट एलपी आणि व्हर्डे पार्टनर्स सारख्या जागतिक कंपन्या भारतात वेगानं आपलं कामकाज विस्तारत आहेत. याचं कारण म्हणजे देशातील स्थानिक कंपन्यांच्या निधीची मागणी सातत्यानं वाढत आहे. EYच्या रिपोर्टनुसार, २०२४ च्या पहिल्या सहामाहीत भारतातील प्रायव्हेट क्रेडिट इनव्हेस्टमेंट विक्रमी ६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
भारतात मोठा वाटा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की या उपक्रमावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आणि कंपन्या अजूनही भागीदारी न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ब्लॅकरॉक आणि जिओ फायनान्शियलच्या प्रवक्त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. जागतिक आर्थिक संकटानंतर जागतिक स्तरावर प्रायव्हेट क्रेडिटचं मार्केट १.७ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं आहे. त्यामुळेच ब्लॅकरॉक इंकसारख्या कंपन्या भारतात संधी शोधत आहेत. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला भारतात आपल्या प्रायव्हेट क्रेडिट बिझनेसचं नेतृत्व करण्यासाठी महेश्वर नटराज यांची नियुक्ती केली होती.
कोण आहेत लॅरी फिंक?
ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जातात. याचं कारण ब्लॅकरॉक १० ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक असेट मॅनेजमेंट करतं. हे प्रमाण भारताच्या जीडीपीच्या अडीचपट आणि अमेरिकेच्या जीडीपीच्या निम्मं आहे. ब्लॅकरॉकच्या स्थितीचा अंदाज आपण यावरून लावू शकता की ही कंपनी जगातील एकूण शेअर्स आणि बाँड्सपैकी १०% एकटीच हाताळते.