नवी दिल्ली : खाद्यपदार्थ, इंधन, घरे, कपडे आणि पादत्राणांच्या किमती वाढल्यामुळे जून महिन्यात किरकोळ चलनवाढ वाढून ५.४ टक्क्यांवर गेली. गेल्या आठ महिन्यांतील हा उच्चांक आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ गेल्या मेमध्ये ५.०१ टक्के होती, तर गेल्या वर्षी जूनमध्ये ती ६.७७ टक्के होती.
केंद्रीय सांख्यिकी संघटनेने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये डाळींचे भाव २२.२४ टक्क्यांनी वाढले. एकूण खाद्य चलनवाढ मेमध्ये ४.८ टक्क्यांनी वाढून ५.४८ टक्क्यांवर गेली. ही चलनवाढ जून २०१४ तील ७.२१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षीच्या फळांच्या किमती या वर्षीच्या किमतीच्या तुलनेत ३.५१ व भाज्यांच्या किमती ५.३७ टक्क्यांनी जास्त होत्या. जून २०१५ मध्ये दूध गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.१८ टक्क्यांनी महाग होते. मांस व मासे यांच्या किमती जूनमध्ये ६.९९ टक्के वाढल्या. मसाल्याच्या भावात ७.९१ टक्क्यांची वाढ झाली. स्नॅक्स व भोजनाच्या किमतीही ७.८४ टक्के वाढल्या. कपडे व चपला-बूट ६.३४, घरे ४.४८, इंधन व वीज ५.९२ टक्क्यांनी महाग झाली. खाद्यतेल ३.०६, धान्य व त्यापासूनची उत्पादने १.९८ टक्के महाग झाले. जूनमध्ये अंडे ५.०९ टक्के महाग होते. गेल्या जून महिन्यात गेल्या वर्षीच्या जूनमधील किमतीच्या तुलनेत साखर आणि मिठायांच्या भावात ८.५५ टक्के घट झाली. रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात चलनवाढ ही काळजीचा विषय असल्याचे म्हटले होते. रिझर्व्ह बँकेचा अंदाज असा आहे की पुढील जानेवारी महिन्यात चलनवाढ ६ टक्के असेल.