नवी दिल्ली: आता लवकरच तुम्हाला कार आणि घर खरेदी कराण्यासाठी 59 मिनिटांत कर्ज मिळू शकणार आहे. बॅंकेकडून कर्ज घ्यायचे असल्यास अनेक फेऱ्या माराण्यापासून अखेर सुटका मिळणार असून असे झाल्यास एका फेरीतच तुम्हाला कर्ज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) बँकांनी ग्राहकांना 59 मिनीटात घर आणि वाहन कर्जासाठी योजनेवर काम सुरू केले आहे. यासाठी बँकांनी ही सुविधा 'psbloansin59minutes' वर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 1 कोटी रुपयांपर्यंत अवघ्या 59 मिनिटांत कर्ज देण्याची योजना एमएसएमई (MSME) पोर्टलवर सुरू आहे. तसेच भारतीय स्टेट बँक (एसबीआय), युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँक यांनी ही मर्यादा 5 कोटींवर वाढविली आहे. बँक ऑफ इंडियाने आता बरीच रिटेल कर्ज या श्रेणीत आणण्याची योजना तयार केली आहे. तसेच आणखी एक सरकारी इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) देखील यासाठी तयारी करत असल्याचे समजते.
बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सलील कुमार यांनी सांगितले की, लवकरच 59 मिनिटांत ग्राहकांना गृह आणि ऑटोसाठी कर्ज दिली जातील. याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकदेखील या योजनेवर काम करत आहे. या योजनेमुळे सामान्य लोकांना कर्ज घेणे सोपं होणार आहे. विशेष म्हणजे मंजुरी पत्र मिळाल्यानंतरही कर्जाची रक्कम जाहीर होण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतात.