RBI Raghuram Rajan : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य केलंय. "सात टक्के आर्थिक विकास दर असूनही भारतात पुरेशा नोकऱ्या निर्माण होत नाहीत. याचा अंदाज काही राज्यांमधील रिक्त पदांसाठी अर्जदारांच्या संख्येवरून लावता येतो. रोजगार निर्मितीसाठी श्रमप्रधान उद्योगांना चालना देण्यावर सरकारने भर देण्याची गरज आहे," अशी प्रतिक्रिया रघुराम राजन यांनी दिली. काही भारतीय, प्रामुख्यानं जे उच्च पदांवर आहेत, उत्तम स्थितीत आहेत, त्यांचं उत्पन्न अधिक आगे. परंतु खालच्या स्तरातील लोकांच्या उत्पन्नाची स्थिती अद्यापही सुधारलेली नाही आणि ती कोविडपूर्व पातळीवरही पोहोचली नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
"हे दुर्दैवी आहे. सात टक्के जीडीपी वाढीसोबत आपण मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार करू असा विचार करत असाल. पण जर आपण आपली उत्पादन वृद्धी पाहिली तर ती अधिक भांडवल प्रधान आहे," असं राजन यावेळी म्हणाले.
आर्थिक विकासाबाबत काय म्हणाले?
सात टक्के दराने वाढणारी भारतीय अर्थव्यवस्था पुरेशा नोकऱ्या निर्माण करत आहे का, असा प्रश्न राजन यांना विचारण्यात आला. "भांडवलावर आधारित उद्योग वेगाने वाढत आहेत, परंतु श्रमप्रधान उद्योगांच्या बाबतीत असं नाही. खालच्या पातळीवर सर्व काही ठीक नाही. नोकऱ्यांची नितांत गरज आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते पाहूही शकता. अधिकृत आकडेवारी विसरून जा," असं उत्तर यावेळी राजन यांनी दिलं.
सरकारच्या 'या' योजनेचं कौतुक
सरकारी नोकऱ्यांसाठी आलेल्या अर्जांची संख्या तुम्ही पाहू शकता, जी खूपच जास्त आहे, असंही ते म्हणाले. यावर्षी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अप्रेंटिसशिप योजनांचं स्वागत केलं. परंतु त्यावर अतिशय बारकाईनं नजर ठेवावी लागेल. त्यात काय काम होतं हे पहावं लागेल आणि जे काम करतात त्याचा अधिक विस्तार करावा लागेल," असं राजन यांनी स्पष्ट केलं.