Join us  

International Womens Day: महिला दिनी मुलीला द्या ‘ही’ खास भेट; फक्त ४१६ ₹च्या गुंतवणुकीवर मिळतील ६५ लाख, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 1:11 PM

Sukanya Samriddhi Yojana: या योजनेत पैसे गुंतवल्यास भविष्यात तुमच्या मुलीला पैशाची अडचण येणार नाही, असे सांगितले जात आहे.

Sukanya Samriddhi Yojana: प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता असते. यासाठी पालक आपल्याला जमेल तशी गुंतवणूक करत असतो. आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल असावे, हा त्यामागील हेतू असतो. तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणुकीची योजना आखत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी खास ठरू शकेल. या योजनेत पैसे गुंतवल्यास भविष्यात मुलीला कोणत्याही पैशाची अडचण येणार नाही. यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळेल.

ही सरकारी योजना दुसरी कोणतीही नसून सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आहे. या योजनेत दररोजच्या केवळ ४१६ रुपयांच्या बचतीसह ६५ लाखांची रक्कम मॅच्युरिटीवर मिळवू शकता. सुकन्या समृद्धी योजनेत दीर्घकालीन गुंतवणूक करता येते. या योजनेतून तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी वेळोवेळी पैसेही दिले जातात. तसेच मॅच्युरिटी किंवा लग्नाच्या वेळी या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर लाभ मिळतो. 

किमान २५० रुपये ठेवण्याची परवानगी

तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायचे असतीलतर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून खाते उघडू शकता. ही एक लोकप्रिय योजना असून १० वर्षांपर्यंतच्या मुलींना सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याची परवानगी आहे. यामध्ये वार्षिक किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये ठेवण्याची परवानगी आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर ही योजना मॅच्युअर होते. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेत गुंतवलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम ती काढू शकते. ज्याचा उपयोग ती तिच्या शिक्षणासाठी करू शकते. तर संपूर्ण रक्कम वयाच्या २१ व्या वर्षीच काढता येते. 

कसा मिळेल ६५ लाखांचा परतावा? 

तुमची मुलगी एका वर्षांची असेल आणि गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल. तर दररोज ४१६ रुपये खात्यात जमा करा. त्यामुळे महिन्याला १२,५०० रुपये जमा होतील. म्हणजेच ही रक्कम या योजनेत दरमहा जमा केली तर, वर्षभरात १,५०,००० रुपये जमा होतील. त्याच वेळी १५ वर्षांत ही गुंतवणूक २२,५०,००० रुपये होतील. ७.६ टक्के व्याज दराने एकूण व्याजाची रक्कम ४२,५०,००० रुपये असेल. तर मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला परिपक्वतेवर ६५,००,००० रुपये मिळतील, असे सांगितले जात आहे. तुमची मुलगी १० वर्षांची असेल आणि तुम्ही आता गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल, तर तुमच्याकडे फक्त ११ वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय असेल. ५ वर्षांची मुलगी असेल तर तुम्ही १६ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकाल. 

दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत सध्या वार्षिक ७.६ टक्के व्याजदर मिळतो. या लहान बचत योजनेतील व्याज वार्षिक आधारावर कंपाऊंड आणि कॅलक्युलेट केले जाते. हे खाते कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते. जुळी किंवा तिळी मुले असल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात. या सरकारी स्कीममध्ये जमा केलेल्या रकमेवर कर नियमानुसार सेक्शन 80C अंतर्गत डिडक्शनसाठी क्लेम करता येतो. 

टॅग्स :गुंतवणूक