इंदौर : गुंतवणुकीसाठी आपल्या थैल्यांचे बंद सैल करा, अशा शब्दांत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे आवाहन केले. यंदा पाऊस चांगला आहे, किमती नियंत्रणात असल्यामुळे मागणी चांगली आहे. गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे, असे जेटली म्हणाले. मध्य प्रदेश सरकारच्या वतीने आयोजित गुंतवणूकदार शिखर परिषदेत जेटली यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. सरकारी खर्चाच्या बळावर हे स्थान भारताने पटकावले आहे. खाजगी गुंतवणूकदार त्यात सहभागी झाले, तर वाढीला आणखी वेग येईल. जेटली यांच्या आधी हिंदुजा उद्योग समूहाचे सह-चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे भाषण झाले. वृद्धीची गती कमी असल्याची तक्रार त्यांनी आपल्या भाषणात केली होती. त्यावर जेटली म्हणाले की, मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, साधारणत: उद्योग क्षेत्र सरकारच्या पुढे असते. तथापि, सध्या सरकार उद्योग क्षेत्राच्या पुढे आहे. हा इतिहासातील अशा प्रकारचा पहिलाच क्षण आहे. सरकारी गुंतवणुकीची गती वाढली आहे. आम्ही तुमची (खाजगी क्षेत्राची) वाट पाहत आहोत. गती वाढवायची असेल, तर त्यासाठी जास्त इंजिनांची गरज आहे. हिंदुजा यांनी गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यासाठी पंतप्रधानांच्या टीमने गती आणखी वाढवायला हवी, अशी माझी अपेक्षा आहे. दुर्दैवाने आम्हाला अपेक्षित गती अजूनही आलेली नाही. जेटली म्हणाले की, जगातील अनेक भागांत मंदी सुरू आहे. त्यामुळे भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. सुदैवाने यंदा मान्सून चांगला आहे. त्यामुळे अन्नधान्याची उपलब्ध भरपूर असेल. महागाई नियंत्रणात राहील. परिणामी व्याजदर कमी राहतील. भांडवलाचा खर्च कमी राहील. त्यामुळे आमच्या समोर चांगली संधी आहे. मंदीचा आमच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. अरुण जेटली म्हणाले की, आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि वस्तूंच्या किमती कमी आहेत. ही बाब भारतासाठी फायदेशीर आहे. कारण भारत या क्षेत्रात खरेदीदार आहे. यात होणारी बचत आपल्याला पायाभूत क्षेत्रात तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीसाठी वापरता येईल. (वृत्तसंस्था)
गुंतवणुकीसाठी आपल्या थैल्यांचे बंद जरा सैल करा!
By admin | Published: October 23, 2016 1:11 AM