लखनौ : तिसऱ्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने रशियाच्या ब्लादिमीर मालकोव याला सरळ गेममध्ये पराभूत करत सय्यद मोदी आंतरराष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसºया फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात मालकोव याला २१-१२, २१-११ असे पराभूत केले. पारुपल्ली कश्यपला फ्रान्सच्या लुकास कोरवीकडून पुढे चाल मिळाली. यामुळे त्याचा दुसºया फेरीतील प्रवेश सुकर झाला.त्याचवेळी मागील आठवड्यात स्कॉटिश ओपन जिंकणाºया युवा खेळाडू लक्ष्य सेनलाही पुढे चाल मिळाली. महिला गटात अस्मिता चालिहाने वृषाली गुम्माडीला २१-१६, २१-१६ असे पराभूत केले. दरम्यान स्पर्धेतील अव्वल मानांकीत शि युकी याला मलेशियाच्या सू तेक झी याच्याकडून २३-२५, १७-२१ असा अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यामुळे आता दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची संधी श्रीकांतकडे आहे. चौथ्या मानांकीत बी. साईप्रणीत यानेही विजयी सुरुवात करताना मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैन याचा २१-१६, २२-२० असा ४७ मिनिटांमध्ये पराभव केला.अन्य एका लढतीत अटीतटीच्या झालेल्या भारतीय खेळाडूंच्या लढतीत अजय जयरामने अनपेक्षित निकाल लावताना समीर वर्माचे आव्हान संपुष्टात आणले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर अजयने जबरदस्त पुनरागमन करताना समीरला १५-२१, २१-१८, २१-१३ असे नमविले. त्याचवेळी समीरचा मोठा भाऊ सौरभ वर्माने सहज आगेकूच करताना कॅनडाच्या झाओडाँग शेंग याचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. (वृत्तसंस्था)
के. श्रीकांतची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 4:40 AM