नवी दिल्ली: रशिया-युक्रेनमध्ये अद्याप सुरू असलेले युद्ध, जगभरातील आर्थिक परिस्थिती आणि देशातील अंतर्गत मुद्द्यांचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. एलआयसीसह अन्य बड्या कंपन्या लिस्ट झाल्या असल्या तरी बाजारातील अस्थिरतेचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसत आहे. मात्र, यात काही कंपन्या तगडी कामगिरी करत गुंतवणूकदारांना रेकॉर्ड ब्रेक रिटर्न देत आहे. यापैकी एका कंपनीने गेल्या ६ महिन्यात कमालच केली असून, यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
छप्परफाड रिटर्न देणाऱ्या कंपनीचे नाव आहे, Kaiser Corporation Limited. गेल्या एक वर्षात या स्टॉकने १७५५२ टक्क्यांचे रिटर्न दिले आहे. कोणीही कंपनीच्या अशा कामगिरीची अपेक्षा केली नव्हती. मात्र, कैसर कंपनीने दमदार कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना ६ महिन्यांत ६१९२ टक्के परतावा दिला आहे. सुमारे ६ महिन्यांपूर्वी BSE वर या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ ९५ पैसे होती. आता हा स्टॉक ६० रुपयांवर गेला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ६३ रुपयांचा टप्पाही ओलांडला होता.
अवघ्या ६ महिन्यांत १ लाखाचे ६३ लाख
गेल्या महिनाभरात कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉक ४६ टक्क्यांनी घसरले आहेत. जर आपण परताव्यावर नजर टाकली तर, एखाद्या गुंतवणूकदाराने ६ महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम ६३ लाखांपेक्षा जास्त झाली असती. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये फक्त १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर ती गुंतवणूक आता १.८५ कोटी रुपयांपर्यंत वाढली असती. तसेच यावर्षीच्या जानेवारीमध्ये या कंपनीत फक्त १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर २१ लाखांहून अधिक रुपयांचा परतावा मिळू शकला असता.
दरम्यान, कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीची स्थापना सन १९९३ मध्ये करण्यात आली होती. ही ट्रेडिंग आणि वितरण क्षेत्रातील म्हणजेच पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक दीर्घकाळापर्यंत करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच आपण गुंतवणुकीपूर्वी शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा, ते आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.