Amul Vs. Nandini Milk : कर्नाटकात अमूलच्या (Amul) एन्ट्रीवरून सध्या राजकारण सुरूच आहे. अमूलनं आपली उत्पादनं लाँच करण्याबाबत निर्णय घेताच कर्नाटकात (Karnataka) वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचा स्थानिक दूध ब्रँड नंदिनी संपवण्याचं षडयंत्र अमूलच्या माध्यमातून रचले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात, आता गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे (GCMMF) एमडी जयेन मेहता (Amul MD Jayen Mehta) यांनी अमूल कर्नाटकातील नंदिनी प्रकल्पातच आईस्क्रीम तयार करत असल्याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी त्यांनी नंदिनी प्रकल्पातच नंदिनी ब्रँडच्या दुधापासून १०० कोटी रुपयांचं आईस्क्रीम तयार केलं होतं. कर्नाटक आणि दक्षिण भारतातील बाजारपेठेत त्याची विक्री होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
“विमानतळ, बंदरं, बँक हिसकावून घेतली, आता मोदीजी नंदिनी दूधही हिसकावून घेणार का?”
नंदिनीच्या दरापेक्षा अमूलचे दर अधिक
“दुधाचे जे दर मुंबई आणि दिल्लीसाठी ठेवण्यात आले आहे त्याच दरात बंगळुरूच्या लोकांनाही दूधाचा पुरवठा करायचा आहे. अमूलच्या दुधाचे दर नंदिनी ब्रँडच्या दुधाच्या दरापेक्षा अधिक आहेत. बंगळुरूमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर त्याचा नंदिनीवर कोणताही परिणाम होणार नाही. दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही,” असं जयन मेहता यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकात अमूलच्या एन्ट्रीच्या वृत्तानंतर त्याला राजकीय रंग चढला आहे. लोकांनी सोशल मीडियावर #savenandini असा हॅशटॅगही सुरू केला होता.
#WATCH | There is no issue of Amul vs Nandini. Both are cooperatives and owned by farmers and both have been working together for the last several decades to make India the largest producer of milk in the world: Jayen Mehta, Amul MD on Amul vs Nandini controversy in poll-bound… pic.twitter.com/8XWC8MrwZZ
— ANI (@ANI) April 11, 2023
सिद्धरामय्या यांनीही केलं होतं ट्वीट
“येथील बँक, बंदर, विमानतळ यापूर्वीच हिसकावून घेतले आहे. आता तुम्ही आमच्याकडून नंदिनीला चोरायचा प्रयत्न करत आहात का? आमची विजया बँक गुजरातच्या बडोदा बँकेत विलीन झाली. कर्नाटकातील बंदरं आणि विमानतळ गुजरातच्या अदानींकडे सोपवण्यात आली. आता गुजरातची अमूल आमची केएमएफ ताब्यात घेण्यास तयार आहे,” असा आरोप करत सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींवर टीकेचा बाण सोडला होता.
‘आम्ही शत्रू आहोत का?’
आम्ही गुजरातींचे शत्रू आहोत का? असा सवालही त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केला. निवडणुकीच्या काळात नंदिनी दूधाचा मुद्दा तापला आहे. विरोधकांनी या मुद्दा उचलून धरला असून एन्ट्री घेतानाच अमूलला मोठा झटका बसलाय. बंगळुरू हॉटेल्स असोसिएशननं अमूलला बॉयकॉट केलं आहे. आपण नंदिनी दूधच वापरणार आहोत असं त्यांनी म्हटलंय.