उमेश शर्मा । सीए
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, दिवाळीच्या निमित्ताने सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके खरेदी करतात. या दिवाळीत करदात्यांसाठी टॅक्स फटाका स्टॉलवर कोणत्या प्रकारचे फटाके आहेत?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, दिवाळी हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. धनतेरस, लक्ष्मीपूजनाच्या आराधनेला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपण फटाके फोडून दिवाळी साजरी करतो. दरवर्षी सरकारकडून नवनवीन प्रकारचे (कर कायदे) फटाके दरवर्षी फोडले जातात. यावर्षीही करदात्यांवर दिवाळीपूर्वीच कॉर्पोरेट टॅक्सचा फॅन्सी फटाका फोडला आहे. ते काही करदात्यांना खुशी देणारे आहेत तर काही वेदना. यंदा चार्टर्ड अकांउटंटची दिवाळी ३१ आॅक्टोबर पूर्वी करदात्यांचे टॅक्स आॅडिट करताना आॅफिसातच जाते की काय, अशी स्थिती आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीतील सुतळी बॉम्ब कोणता?
कृष्ण : अर्जुना, सरकारने ‘जीएसटीत आयटीसीचा क्रेडिट घेण्यावर निर्बंध’ हा सुतळी बॉम्ब फोडला आहे. जीएसटीआर २-ए मध्ये पात्र असलेल्या आयटीसीच्या १२ टक्क्यांपर्यंत जास्तीत जास्त इनपुट ट्रॅक्स क्रेडिट क्लेम करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे आणि याचा करदात्यांवर मोठा परिणाम होणार आहे. प्रत्येक करदात्यांनी ही तरतूद लक्षात ठेवून त्याचे पालन करावे. अन्यथा सरकारचा सुतळी बॉम्ब करदात्यांवर फुटेल.
अर्जुन : कृष्णा, फटाक्याच्या स्टॉलवर करदात्यांसाठी ‘फॅन्सी फटाके’ उपलब्ध आहेत का?
कृष्ण : अर्जुना, फॅन्सी फटाके आवाज न काढता चमकतात. ते पाहणे आनंददायी असतात. दिवाळीत फॅन्सी फटाके म्हणजे आयकरात कॉर्पोरेट करदर २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. हा एक नवीन आनंदाने स्वागत करणारा फटाका आहे.
अर्जुन : कृष्णा, टॅक्स फटाक्यांच्या स्टॉलवर फुलपाखरू फटाके उपलब्ध आहेत का?
कृष्ण : अर्जुना, टॅक्स फटाक्यांच्या स्टॉलवर फुलपाखरू फटाके म्हणजे असे फटाके जे उडवल्यावर कोणत्या दिशेने जातील हे माहीत नसते. आयकरातील ई-असेसमेंट योजना ही फुलपाखरू फटाक्यांसारखी आहे. ज्याअंतर्गत इन्कम टॅक्स रिटर्नची तपासणीअंतर्गत कोणत्या दिशेने जाईल हे करदात्याला व अधिकाऱ्याला कळू शकणार नाही.
अर्जुन : कृष्णा, फटाक्यांच्या स्टॉलवर ‘लवंगी’ फटाका उपलब्ध आहे का?
कृष्ण : अर्जुना, लवंगी फटाका हा मुलांना दिला जातो. ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न दोन कोटींपर्यंत आहे अशा करदात्यांना जीएसटीआर-९ दाखल करण्याचा सवलतींचा पर्याय दिला आहे.
अर्जुन : कृष्णा, फटाक्यांच्या स्टॉलवर अनेक प्रकारचे फटाके उपलब्ध आहेत त्यामधील रॉकेट कोणते?
कृष्ण : अर्जुना, दिवाळीतील नवीन रॉकेट म्हणजे आयकरात नवीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्थापन केल्यास कॉर्पोरेट करदर २५ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आले आहेत. (जर दिलेल्या अटींची पूर्तता झाली तर) या योजनेमुळे अर्थव्यवस्थेची प्रगती होईल, अशी अपेक्षा करूया.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमधील फटाक्यांच्या स्टॉलवर लड उपलब्ध आहे का?
कृष्ण : अर्जुना, लडसुद्धा उपलब्ध आहे. लड म्हणजे एक फटाका दुसºयाशी जोडलेला असतो आणि एक फटाका फुटला तर सगळेच फुटतात. तसेच जीएसटीत जुळवाजुळवी करण्याची संकल्पना आहे. विक्री दुसºयाच्या खरेदीशी संबंधित असते. जीएसटीआर १ मधील माहिती ही प्राप्तकर त्याच्या जीएसटीआर २-ए मध्ये प्रलंबित होते. जर माहितीची जुळवणी झाली नाही तर जीएसटीआर २-ए मध्ये लड फुटेल.
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
करनीती भाग-३0९ - आयकर आणि जीएसटी फटाका स्टॉल
अर्जुना, लडसुद्धा उपलब्ध आहे. लड म्हणजे एक फटाका दुसºयाशी जोडलेला असतो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 01:10 AM2019-10-28T01:10:47+5:302019-10-28T01:11:22+5:30