मुंबई : जम्मू-काश्मिरातील पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी येत्या पाच वर्षांत २,४00 कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या सहकार्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.जम्मू-काश्मीरचे पर्यटन सचिव फारुक शाह यांनी ही माहिती दिली. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, कारगीलसारख्या दुर्लक्षित परंतु पर्यटन विकासास वाव असलेल्या क्षेत्रात हा पैसा वापरला जाईल. या रकमेपैकी २ हजार कोटी रुपये केंद्र सरकार देईल. उरलेली रक्कम राज्य सरकारची असेल. याशिवाय खाजगी क्षेत्राकडून पर्यटन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली जात आहे. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉटेलांची साखळी आहे. ले मेरिडियन, द शेरेटन समूह, आयटीसी यांची हॉटेले उभी राहत आहेत. रामदा समूहाचे हॉटेल आधीच तयार झाले आहे. फारुक शाह म्हणाले की, जम्मू-काश्मिरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यांचा पर्यटन केंद्र म्हणून विकास केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील सहली आयोजकांनाही आम्ही अशा स्थळांचा प्रचार करण्याची विनंती केली आहे. कारगीलसारखी ही स्थळे लोकप्रिय होऊ शकतात.शाह म्हणाले की, पर्यटनासाठी वारसा स्थळांपासून साहसी खेळांच्या स्थळांपर्यंत सर्व प्रकारची पर्यटन स्थळे काश्मिरात आहेत. शिवाय देशात कोणीही स्पर्धक नाही. आम्ही देशात सर्वोत्तम आहोत आणि आमच्या कोणी स्पर्धा करू शकत नाही. राज्यात पायाभूत सोयींचीही कमतरता नाही. आमच्याकडे सर्वोत्तम गोल्फिंग स्थळे आहेत. सर्वोत्तम वारसा स्थळे आहेत. शॉपिंग आणि खानपानाच्या बाबतीत आमची स्थळे जगात प्रसिद्ध आहेत. जम्मूसारखे मोठे तीर्थस्थळ आहे. काश्मीर तर पृथ्वीवरील स्वर्गच आहे. लदाखमध्ये सर्वोत्तम साहसी खेळाची स्थळे आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)
काश्मीर पर्यटन विकासासाठी २,४00 कोटी रुपये गुंतविणार
By admin | Published: February 24, 2017 1:07 AM