नवी दिल्ली : डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी येणारी १६ मार्च ही तारीख महत्त्वाची आहे. कारण आतापर्यंत ज्यांनी ऑनलाइन व्यवहारांसाठी कधीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरली नसतील त्यांच्या कार्डांची सुविधा १६ मार्चनंतर अनिवार्यपणे थांबवली जाणार आहे.
डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडू लागल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १५ जानेवारीला या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध केली होती. यामध्ये ‘ऑनलाइन’ आणि ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंट’मधली सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डांसंदर्भातला हा निर्णय आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या अधिसूचनेनुसार, विद्यमान कार्डासाठी, जारीकर्त्याने (कोणतीही देशी किंवा आंतरराष्ट्रीय बँक) सध्याच्या कार्डावरील ऑनलाइन आणि संपर्करहित व्यवहाराचे हक्क अक्षम करायचे की नाही याचा निर्णय त्यांच्या जोखमीच्या आधारे घ्यायचा आहे. मात्र जी विद्यमान कार्डे ऑनलाइन, आंतरराष्ट्रीय किंवा संपर्कविहीन व्यवहारांसाठी कधीही वापरली गेली नसतील ती अनिवार्यपणे अक्षम करावी लागतील. यासाठीची अंतिम मुदत १६ मार्च निर्धारित करण्यात आली आहे.