Join us

पैसे तयार ठेवा! अदानींच्या आणखी एका कंपनीचा येतोय IPO, गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 9:11 AM

Adani Group IPO: आयपीओद्वारे कमाई करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार आहे.

Adani Group IPO: आयपीओद्वारे कमाई करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार आहे. दरम्यान, गौतम अदानी समूहाची कंपनी- अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचा आयपीओ येणार आहे. गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांनी ही माहिती दिली आहे. जीत अदानी हे अदानी समूहाच्या विमानतळ व्यवसायाचं काम पाहतात. सध्या विमानतळाचा व्यवसाय समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या अंतर्गत आहे.

काय म्हटलं जीत अदानी यांनी?

"आमच्या समोर काही टार्गेट्स आहेत, ती पूर्ण करण्यासाठी लवकर विमानतळ व्यवसाय लिस्ट केला जाईल," असं जीत अदानी म्हणाले. विमानतळ व्यवसाय महत्त्वाची वाढ नोंदवत असल्याचं जीत अदानी यांनी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं. अदानी एअरपोर्ट्स मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कामकाज पाहते आणि नवी मुंबई विमानतळ विकसित करत आहे. कंपनी अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम येथे विमानतळ चालवते.

नवी मुंबई विमानतळ केव्हा होणार पूर्ण?

नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. अदानी समूहामार्फत चालवल्या जाणार्‍या सर्व विमानतळांचा सध्या विस्तार सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. अदानी एअरपोर्ट्सनं गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि यावर्षी ८० मिलियन प्रवाशांना सेवा पुरवली असल्याचं जीत अदानी म्हणाले. आमचा व्यवसाय पूर्णपणे आत्मनिर्भर झाला की त्यानंतर आम्ही लिस्टिंगसाठी सक्षम होतो, असं आमचं बिझनेस मॉडेल कायम राहिलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

२०२२ मध्ये आलेला आयपीओ

यापूर्वी अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मारचा आयपीओ लॉन्च करण्यात आला होता. अदानी विल्मरचे शेअर्स ८ फेब्रुवारी २०२२ रोजी लिस्ट झाले होते. शेअरची इश्यू प्राईज ₹२१८ ते ₹२३० होती. कंपनीचे शेअर्स ८ फेब्रुवारी रोजी बीएसईवर २२१ रुपयांच्या डिस्काऊंटवर लिस्ट झाले. दरम्यान, नंतर या शेअरनं गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा दिला.(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक