मुंबई : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरणीचे सत्र सुरू असतानाही दुसरीकडे बाजारात आयपीओ मोठ्या प्रमाणावर येत आहेत. येत्या आठवड्यात पाच आयपीओ शेअर बाजारात खुले होणार आहेत तसेच आठ आयपीओ लिस्ट होणार आहेत.
पाच आयपीओपैकी एक मेनबोर्ड असून, चार एसएमई आयपीओ असतील. यामुळे गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी चालून आली आहे. येत्या आठवड्यात लिस्ट होणाऱ्या आयपीओमध्ये तीन मेन बोर्ड आणि ५ एसएमई बोर्ड आयपीओ असतील.
पुढील आठवड्यात लक्ष्मी डेंटल लिमिटेडचा आयपीओ येत आहे. या माध्यमातून ६९८.०६ कोटींची उभारणी करण्यात येणार आहे. हा आयपीओ १३ जानेवारीला बोलीसाठी खुला होईल, १५ जानेवारीला बंद होईल.
एसएमई विभागातील चार आयपीओंपैकी पहिला अहमदाबादच्या काबरा ज्वेल्सचा असेल. हा ज्वेलरी रिटेलर आपला ४० कोटींचा पहिला सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव १५ जानेवारीपासून उघडणार आहे, जो १७ जानेवारीला बंद होईल. मुंबईस्थित स्टॉक ब्रोकर रिखव सिक्युरिटीज १५ ते १७ जानेवारी दरम्यान ८९ कोटींचा आयपीओ लाँच करणार आहे.