वक्तशीर (पंक्चुअल) असणे ही चांगली सवय मानली जाते. बंगळुरूच्या Bengaluru) केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Kempegowda International Airport) गेल्या तीन महिन्यांपासून सलग जगातील सर्वात वक्तशीर (पंक्चुअल) विमानतळ म्हणून स्थान देण्यात आले आहे. एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सीरिअमच्या ऑन-टाइम कामगिरी अहवालात ही बाब समोर आली आहे.
सीरिअम अहवाल नियोजित वेळेच्या १५ मिनिटांच्या आत सुटणाऱ्या फ्लाइट्सच्या टक्केवारीच्या आधारावर जगभरातील विमानतळांच्या वक्तशीरपणाचे रॅंकिंग केले जाते. वृत्तानुसार, जगातील सर्वात वक्तशीर विमानतळ (world’s most punctual airports) टॉप-5 च्या यादीत समाविष्ट असलेल्या इतर विमानतळांमध्ये यूटामधील (अमेरिका) सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे. तर हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तिसऱ्या स्थानावर आहे.
अमेरिकेतील मिनियापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ चौथ्या स्थानावर आणि कोलंबियामधील एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ पाचव्या स्थानावर आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने जुलैमध्ये 87.51 टक्के, ऑगस्टमध्ये 89.66 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 88.51 टक्क्यांसह प्रवाशांसाठी वेळेवर प्रस्थान करण्याचा प्रभावी अनुभव कायम ठेवला, असे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (BIAL) एका निवेदनात म्हटले आहे.
जगातील टॉप 10 पंक्चुअल एयरपोर्ट
1. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरू, भारत
2. सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, यूटा, अमेरिका
3. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद, भारत
4. मिनियापोलिस-सेंट. पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिनेसोटा, अमेरिका
5. एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ, बोगोटा, कोलंबिया
6. ओस्लो विमानतळ गार्डेरमोएन, नॉर्वे
7. डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ, अमेरिका
8. हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमेरिका
9. हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, दोहा, कतार
10 सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमेरिका