Baba Ramdev News: केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील न्यायालयानं बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बालकृष्ण (Acharya Balkrishna) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींशी संबंधित फौजदारी खटल्यात हजर न राहिल्यानं बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. यापूर्वी पलक्कडयेथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी-२ यांनी जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. ज्यामध्ये बाबा रामदेव यांनी १ फेब्रुवारीला हजर राहणं आवश्यक होतं. मात्र, ते हजर न झाल्यानं न्यायालयानं शनिवारी अजामीनपात्र वॉरंट बजावून १५ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले.
केरळच्या औषध निरीक्षकांनी पतंजली आयुर्वेदची सहयोगी दिव्य फार्मसीविरोधात ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला होता. विशिष्ट आजारांच्या उपचारांसाठी काही औषधांच्या जाहिरातींवर बंदी घालणाऱ्या कलम ३ चं उल्लंघन झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. कलम ३ (डी) या कायद्यांतर्गत सूचीबद्ध रोगांचं निदान, बरं किंवा प्रतिबंध करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालते.
दिव्य फार्मसी प्रथम आरोपी
दिव्य फार्मसीला या प्रकरणात पहिले आरोपी करण्यात आले आहे, तर आचार्य बालकृष्ण यांना दुसरे आणि बाबा रामदेव यांना तिसरे आरोपी करण्यात आलेय. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे पतंजली आयुर्वेदला यापूर्वी कायदेशीर चौकशीला सामोरं जावं लागलंय. आधुनिक औषधांचा, विशेषत: अॅलोपॅथीचा अपमान केल्याबद्दल आणि आजारांच्या उपचारांबाबत अप्रमाणित दावे केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं कंपनीविरोधात अवमान नोटीस बजावली होती. त्यानंतर बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर हे प्रकरण बंद करण्यात आलं.