नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे देशभरात खादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुकीच्या काळात खादीचा कुर्ता, पायजमा, रुमाल व इतर कपड्यांची खूपच मागणी वाढली आहे. याचमुळे २०१८-१०१९ या आर्थिक वर्षात खादीचा व्यवसाय मागील वर्षाच्या तुलनेत २९ टक्क्यांच्या वाढीसह ३,२१५ कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.
खादी ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांचा विचार करता २०१३-१४ नंतर खादीच्या व्यवसायात चार टक्के वाढ झाली आहे. त्यावर्षी खादीचा व्यवसाय ८११ कोटी रुपये होता. तो आता २०१८-१९ मध्ये ३,२१५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
ते म्हणाले की, मागील आर्थिक वर्षात लोकसभेच्या निवडणुकीमुळे खादीच्या कपड्यांना चांगली मागणी होती. उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे राजकीय नेते व कार्यकर्त्यांना उन्हातान्हात काम करावे लागते. या काळात खादीचे कपडे जास्त वापरले जातात. कडक उन्हाळ्यात हे कपडे आरामदायक असतात. आरोग्याच्या दृष्टीनेही खादीचे कपडे अनुकूल व फायदेशीर ठरतात, असे सक्सेना म्हणाले.
२००४ ते २०१४ च्या कालावधीत खादीच्या विक्री व्यवसायात सुमारे ७ टक्क्यांची वाढ नोंदली गेली होती. तथापि, मागील पाच वर्षांच्या काळात ही वाढ दहाच्याही वर गेली.
तयार कपड्यांची मागणी जास्त
दिल्ली राष्टÑीय राजधानी क्षेत्र, उत्तर प्रदेश व बिहारसह देशाच्या विविध राज्यांत खादीच्या कपड्यांची व विशेषत: तयार कपड्यांची मागणी जास्त आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खादीच्या विक्रीत ४० टक्के हिस्सा कपड्याचा व ६० टक्के हिस्सा तयार कपड्यांचा राहिला आहे. देशाच्या दूरस्थ गावांमधील कारागिरांनी तयार केलेले कुर्ता, पायजमा, जॅकीट, शर्ट, रुमाल, महिलांसाठी सलवार, धोती साडीचीही मागणी वाढली आहे.
देशात एकूण ८,०६० विक्री केंद्र
उत्तर प्रदेशात खादी ग्रामोद्योग आयोगाचे एक हजारपेक्षा अधिक व बिहारमध्ये ४०० पेक्षा अधिक विक्री केंद्रे आहेत. मागील वर्षी या केंद्रांवर खादीच्या कपड्यांना चांगली मागणी होती. देशभरात आयोगाची एकूण ८,०६० विक्री केंद्रे आहेत.
लोकसभा निवडणुकीमुळे खादीला ‘अच्छे दिन’, व्यवसायात २९ टक्के वाढ
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे देशभरात खादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुकीच्या काळात खादीचा कुर्ता, पायजमा, रुमाल व इतर कपड्यांची खूपच मागणी वाढली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 05:19 AM2019-05-06T05:19:28+5:302019-05-06T05:19:49+5:30